प्रा. रूपेश पाटील
सावंतवाडी : गेली सात ते आठ वर्ष सातत्याने सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातील सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला या तीनही तालुक्यात घराघरात पोहोचलेली ‘हक्काची ताई’ म्हणून अर्चना घारे – परब परिचित आहेत. त्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निवडणूक लढण्यासाठी उत्सुक होत्या. मात्र महाविकास आघाडीच्या वतीने भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी देऊन ऐनवेळी उबाठा शिवसेनेत दाखल झालेले माजी आमदार राजन तेली यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतून तिकीट जाहीर झाले आहे. असे असताना आता अर्चना घारे यांनी विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रत्यक्षरीत्या प्रचाराला सुरुवात केली आहे. यात सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातील विविध भागातून त्यांना कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा मिळत असलेला प्रतिसाद आणि जनतेसोबत त्यांनी सातत्याने ठेवलेला जनसंपर्क याच्या अनुषंगाने उद्या सावंतवाडी येथील वैश्य भवन येथे सकाळी ११ वाजता कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला आहे.
दरम्यान अर्चना घारे – परब यांनी जर अपक्ष निवडणूक लढवली तर चौरंगी लढतीची शक्यता आहे. मात्र आता उद्याच्या मेळाव्यात कार्यकर्ते आणि पदाधिकारी नेमकी अर्चना घारे यांना काय साद घालतात?, अपक्ष लढावे की महाविकास आघाडीचा धर्म पाडावा?, शरद पवार यांनी पक्षाच्या वतीने त्यांना नेमका काय सल्ला दिलाय?, यावर बरेच अवलंबून आहे.
मात्र एकूणच परिस्थिती पाहता अर्चना घारे – परब निवडणुकीत अपक्ष लढणार हेच त्यांच्या सोशल मीडियाच्या प्रचार यंत्रणेवरून स्पष्ट होत आहे, हे मात्र नक्की.

अर्चना घारे ठरू शकतात जायंट किलर..!
सावंतवाडी विधानसभा क्षेत्रात फार मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. याचे कारण म्हणजे ऐनवेळी राजन तेली यांनी मशाल हाती घेत उबाठा सेनेतील इच्छुकांची नाराजी ओढवून घेतली आहे. असे असताना भारतीय जनता पार्टीचे राज्य उपाध्यक्ष व उद्योजक विशाल परब आणि सातत्याने जनसंपर्क ठेवून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणाऱ्या अर्चना घारे – परब यांनीही आता अपक्ष लढविण्याचे संकेत दिले आहेत. हे दोन्ही उमेदवार तगडे असून अर्चना घारे परब यांची महिला वर्गात चांगली ओळख निर्माण झाली आहे. तसेच विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांद्वारे त्यांनी महिलांची मने जिंकली आहेत. त्यामुळे अर्चना घारे – परब हे किती मते मिळवतात?, यावर यशापयशाची गणिते अवलंबून आहेत.
दुसरीकडे सातत्याने मोठमोठे कार्यक्रम आयोजित करून तसेच प्रत्येक सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन आर्थिक सहकार्य करणारे विशाल परब हे देखील ही निवडणूक मोठ्या ताकदीने लढणार आहेत. अशातच दोन तुल्यबळ उमेदवार अर्थात शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि माजी आमदार राजन तेली यांची डोकेदुखी वाढणार आहे. एकूणच मतदार संख्या पाहता पुरुषांच्या तुलनेत महिलाही समसमान असल्याने अर्चना घारे या एकमेव महिला उमेदवार असल्यामुळे जर महिला वर्गांनी त्यांच्याकडे मोर्चा वडवला तर त्या ‘जायंट किलर’ ठरू शकतात, हे मात्र नक्की.!


