मुंबई : मागील काही दिवसांपासून माहीम विधानसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. कारण या मतदारसंघातून मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनी पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. सदा सरवणकर यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी महायुतीच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरु आहेत. मात्र सदा सरवणकर निवडणूक लढण्यावर ठामच आहेत.
याबाबत माहीम विधानसभा मतदारसंघाबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी भाष्य केले आहे. माहीममधून आमचे गेल्या 3 ते 4 टर्म पासून आमदार आहे, ते आमचे जुने कार्यकर्ते आहेत. ते तिथले आमदार आहेत, त्यांच्याशी देखील मी चर्चा केली. मात्र माहिममधील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आक्रमक आहेत. त्यांना निवडणूक लढायची आहे. कार्यकर्त्यांकडे देखील आम्हाला लक्ष द्यावं लागेल, असे त्यांनी म्हटले. आता मनसेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची पहिली तोफ धडाडली आहे. त्यामुळे माहीम विधानसभा मतदारसंघाचा वाद तापल्याचे दिसून येत आहे.
मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केलाय. त्यांनी म्हटलंय की, राज ठाकरे यांचा स्वभाव प्रचंड वेगळा आहे. आम्ही कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव घेऊन एकनाथ शिंदे किंवा महायुतीकडे गेलेलो नाही. मात्र, आम्ही ज्या पद्धतीने लोकसभेला पाठिंबा दिला त्याची परतफेड म्हणून तरी या लोकांनी विचार करायला हवा होता. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोघेही संकुचित विचारांचे आहे हे यावरून सिद्ध होते, अशी टीका त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.


