मुंबई : राज्यात थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली असून, विदर्भापासून उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातही थंडीची हजेरी पाहायला मिळत आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये आणि सीमेपलिकडे असणाऱ्या पर्वतीय क्षेत्राकडून शीतलहरींचा प्रवाह मागील काही दिवसांमध्ये वाढल्यामुळं हा प्रवाह आता महाराष्ट्रापर्यंत परिणाम दाखवताना दिसत आहे. तिथं दक्षिण भारतही हा शीतलहरींनी प्रभावित होताना दिसत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या गार वाऱ्यांचा झोत वेगानं राज्यात येत असल्यामुळं विदर्भाच्या तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. थंडीचे प्रमाण कमी असलेला कोकणातील काही भागही याला अपवाद नाही.
राज्यात थंडीला पोषक हवामान असल्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा शेवट कडाक्याच्या थंडीनंच होणार असल्याचा अंदाज आहे. नाशिकमध्ये तापमान १२.४ अंशांवर पोहोचला आहे, तर जळगावात १३.२ अंश सेल्सिअस, महाबळेश्वरमध्ये १३.२ अंश, साताऱ्यात १४.५ अंश, कोल्हापुरात १७.२ अंश इतकं तापमान आहे. विदर्भातही हीच स्थिती असून, नागपुरात पारा १३.६ अंश, गडचिरोली इथं १४ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, हिमालय क्षेत्रासह उत्तर भारतात एक तीव्र थंड हवेचा झोत सक्रीय असल्यामुळं उत्तर भारतात थंडी वाढली आहे. याच उत्तर भारतीय राज्यांमधून येणाऱ्या वाऱ्यामुळे राज्यभरात थंडीचं प्रमाण येत्या दिवसात वाढण्याचे संकेत मिळत आहेत. राज्याच्या किनारपट्टी क्षेत्रामध्येही वातावरणात बदल झाले असून, किमान आणि कमाल तापमानाच घट होताना दिसत आहे.
मागील काही दिवसांपासून आणि येत्या काही दिवसांमध्येही देशासह राज्यात थंडीसाठी पूरक वातावरण राहणार असून, महाराष्ट्रात शीतलहरींमध्ये अडथळे आणणारे कोणतेही घटक सक्रिय नसल्यामुळं गुलाबी थंडी बोचऱ्या थंडीचं रुप धारण करू शकते. त्यातच आकाश निरभ्र असल्यामुळे पंजाब, हरयाणा आणि राजस्थान दरम्यान असणाऱ्या हवेच्या उच्च दाब क्षेत्रामुळे ईशान्यकडून महाराष्ट्राकडे येणाऱ्या थंड कोरड्या वाऱ्यामुळे थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे.
ADVT –




