कणकवली : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या आंतर विभागीय बॉल बॅडमिंटन क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ.
प्रा. सौ.राजश्री साळुंखे यांच्या हस्ते झाले. यावेळी मुंबई विद्यापीठ निवड समितीचे अध्यक्ष डॉ. आदित्य कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र मुंबरकर, पर्यवेक्षक महादेव माने, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य डॉ. सोमनाथ कदम, प्रा. हरीभाऊ भिसे, निवड समिती सदस्य राहुल अकुळ, चिपळूण येथील प्रा. राम कदम, प्रा. अदिती मालपेकर- दळवी, प्रशिक्षक मंदार परब व प्रशिक्षक, खेळाडू आदि उपस्थित होते.
मुंबई विद्यापीठाच्या वतीने झालेल्या तळकोकणातील या पहिल्या स्पर्धा असून आंतर विभागीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत मुंबई विद्यापीठातील कोकण विभाग मुंबई महानगर मुंबई उपनगर आणि ठाणे या चार विभागातील एकूण आठ संघ सहभागी झाले होते.
अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या आंतर विभागीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत अजिंक्यपद मुंबई महानगर (मुले) संघाने पटकावले तर मुलींच्या संघापैकी ठाणे विभागातील मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत मुलांच्या संघापैकी द्वितीय क्रमांक मुंबई उपनगर व तृतीय क्रमांक ठाणे विभागाने मिळवला. तसेच मुलींच्या संघापैकी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मुंबई महानगर संघाने तर तृतीय क्रमांक कोकण विभागाने मिळविला.
सर्व विजेत्या संघांना प्र. प्राचार्य युवराज महालिंगे, कार्यालयीन अधीक्षक श्री. संजय ठाकूर, मुंबई विद्यापीठ निवड समितीचे अध्यक्ष डॉ. आदित्य कुलकर्णी आदींच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्रे वितरण करण्यात आले.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिमखाना विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र मुंबरकर, जिमखाना विभाग सदस्य प्रा.अदिती मालपेकर- दळवी, मंदार परब, प्रा. सत्यवान राणे, प्रा. हेमंत गावित, मुंबई विद्यापीठातील कर्मचारी श्री संतोष पेडणेकर , अक्षय तळेकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे विभाग प्रमुख प्रा.सुरेश पाटील, प्रा.प्रियांका लोकरे,प्रा. प्रवीण कडूकर , श्री संदेश कसालकर, सागर वनस्कर व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
ADVT –