पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेची काल (11 ऑगस्ट) सांगता झाली. 26 जुलैपासून ऑलिम्पिकच्या स्पर्धेची सुरुवात झाली होती. ऑलिम्पिकच्या स्पर्धेत 10 हजारांहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये 32 विविध क्रीडा प्रकारात एकूण 329 पदकं देण्यात आली. मात्र यादरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मिळालेल्या पदकाचा रंग उडाल्याची घटना घडली आहे. ब्रिटनची कांस्य पदक विजेती यास्मिन हार्परने पदकाचा रंग उडाल्याचा दावा केला आहे. यास्मिन हार्परने सोशल मीडियावर रंग निघालेल्या कांस्य पदकाचा फोटोही शेअर केला आहे. यास्मिनने 100 मीटर सिंक्रोनाइस स्प्रिंगबोर्ड स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं होतं. पॅरिस ऑलिम्पिक आयोजकांकडून यावर अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
अमेरिकन कांस्य पदक विजेता नायजा हस्टन याने देखील सोशल मीडियावर पोस्ट करत पदकाचा रंग उडाल्याचं म्हटलं आहे. हे ऑलिम्पिक पदक नवे करकरीत असतानाच चांगले वाटते. पण थोड्या वेळाने आपल्या त्वचेवरील घाम या पदकावर लागल्यानंतर आणि मित्रांकडे काहीवेळ दिल्यानंतर या पदकाचा दर्जा समोर दिसून येतो. हे पदक मिळून केवळ एक आठवडाच झाला आहे. बहुतेक याचा दर्जा वाढवायला हवा, असं नायजा हस्टनने म्हटलं आहे.


