सावंतवाडी : मुख्यमंत्र्याचे माजी माहिती अधिकारी व पर्यटन चळवळीतील कार्यकर्ते, सावंतवाडीचे सुपुत्र, एक उत्तम स्तंभ लेखक सतीश पाटणकर यांनी महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृतीवर आधारित ‘जाऊ तेथे खाऊ’ व ‘कोकणातील आयकाॅन; अशी दोन तपशीलवार दर्जेदार पुस्तके लिहिलेली असून या दोन्ही पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, प्रा. अशोक बागवे, कौशल इनामदार व स्वामी प्रकाशनचे रजनीश राणे हे मान्यवर उपस्थित राहणार असून पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे मस्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते होणार आहे. या प्रकाशन सोहळ्याचे निमंत्रण आज मंत्री नितेश राणे यांना भेटून देण्यात आले.
यावेळी या आयोजन समितीच्या वतीने समितीचे निमंत्रक अॅड. नकुल पार्सेकर, लेखक सतीश पाटणकर व समिती सदस्य जितेंद्र पंडित, नंदू तारी यांनी नितेश राणे यांना याबाबत विनंती केली. त्यांनी हे निमंत्रण स्वीकारले असून त्यांच्या शुभहस्ते हा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. पर्यटन व्यवसायिक महासंघ सिंधुदुर्ग, सावंतवाडी पत्रकार संघ व कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा सावंतवाडी या तिन्ही संस्थाच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजन समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीत ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक, पर्यटन व्यवसायिक महासंघाचे कार्यवाह अॅड. नकुल पार्सेकर, कोकण मराठी साहित्य परिषदेचे सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष अँड. संतोष सावंत, सावंतवाडी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, पर्यटन महासंघाचे तालुकाध्यक्ष जितेंद्र पंडित, नंदू तारी, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, शिवप्रसाद देसाई, संदीप देसाई, सचिन रेडकर, सीताराम गावडे, प्रा. रूपेश पाटील, अमोल टेमकर, राजू तावडे, विनायक गांवस आदींचा समावेश आहे.


