सावंतवाडी : तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यातील कलंबिस्त हे सैनिकी परंपरा असलेले गाव आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून कलंबिस्त हायस्कूलमध्ये व्यवसायभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस आहे, असे मत कलंबिस्त पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवाजी सावंत यांनी व्यक्त केले. या शाळेतील इयत्ता दहावीची सन 1992 – 93 च्या विद्यार्थ्यांच्या बॅचचा एक अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सावंत बोलत होते. तब्बल 32 वर्षानंतर इयत्ता दहावीची बॅच एकत्र आली होती. शालेय जीवनातील आपले गुरुवर्य यांचे ऋण फेडण्याच्या दृष्टीने गुरुजनांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
तब्बल 32 वर्षानंतर ही दहावी ‘अ’ ची बॅच एकत्र आली. या बॅचने अनोख्या पद्धतीने गुरुजनांचा सन्मान व शाळेच्या संस्थाध्यक्ष, पदाधिकाऱ्यांचा गौरव कार्यक्रम ठेवला होता. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून कलंबिस्त हायस्कूल संस्थेचे अध्यक्ष शिवाजी सावंत, संचालक सुरेश राऊळ, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव, सेवानिवृत्त शिक्षक एस. एन. सुर्वे, शशिकांत धोंड, विजयकुमार पाटील आदी उपस्थित होते. यावेळी ‘पर्यावरण बचाव’ हा संकल्प करत या बॅचच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात सुपारीचे पाच झाडे लावून कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यानंतर कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन व सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार संस्थाध्यक्ष श्री. सावंत यांच्या हस्ते घालण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांचे या बॅचच्या वतीने स्वागत करण्यात आले.
कलंबिस्त पंचक्रोशी गेल्या पन्नास वर्षांपूर्वी या भागात एक शैक्षणिक सुविधा असणारा हा गाव म्हणून ओळखला जात आहे. सह्याद्री पट्ट्यातील दशक्रोशीत शैक्षणिक हब असणारा हा कलंबिस्त गाव अशी ओळख आहे. ही ओळख पुन्हा निर्माण व्हावी, यासाठी नव्या शैक्षणिक उपक्रमामध्ये ‘मेक इन इंडिया’च्या नव्या धर्तीवर व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार यावेळी मांडण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना श्री. सावंत म्हणाले, या बॅचने एकत्र येत हा कलंबिस्त पूर्वीसारखा शैक्षणिक दृष्ट्या प्रगत व्हावा आणि येथे एक शैक्षणिक हब निर्माण व्हावे, या दृष्टीने ही संस्था निश्चितच कार्यरत आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्याचा संकल्प आहे. या संस्थेची ही शाळा आज वेगळ्या धर्तीवर उभी आहे. त्याचे सर्व श्रेय उद्योजक मनोहर बिडये यांना जाते. दहावीच्या या 1992 – 93 सालची बॅच एकत्र आली. नवे संकल्प आणि नवी दिशा संस्थेला आणि शाळेला निर्माण करण्याच्या दृष्टीने त्यांचा हातभार लागेल. त्यांनी गुरुजनांचा व आम्हा संस्था चालकांचा केलेला सन्मान खरोखरचं कौतुकास्पद आहे. असेही ते म्हणाले.
यावेळी सेवानिवृत्त शिक्षक एस. एन. सुर्वे, विजयकुमार पाटील, शशिकांत धोंड यांनी माजी विद्यार्थी बत्तीस वर्षानंतर एकत्र आलेत आणि त्याने जी संकल्पना मांडली आहे ती खरोखरच आजच्या नव्या शैक्षणिक धोरणाला पोषक आहे. या शाळेत आपण घडलो, मोठे झालो, त्या शाळेचे स्मरण होत आहे. या बॅचचे विद्यार्थी उद्योजक तसेच अनेक विविध क्षेत्रात आज कार्यरत आहेत. त्यांचा नावलौकिक पाहून आम्हाला खऱ्या अर्थाने गुरुवंदना मिळाली. असेच तुम्ही पुढे मोठे होत जा. ‘या मुलांनो परत फिरा रे, अपुल्या शाळेकडे!’ अशी हाक यावेळी शिक्षकांनी दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून बोलताना मुख्याध्यापक अभिजीत जाधव म्हणाले, 32 वर्षानंतर आपल्या शाळेच्या गावाच्या शैक्षणिक विकासासाठी आपला अमूल्य वेळ देत शाळेच्या पुन्हा आठवणी जागवण्यासाठी ही बॅच एकत्र आली. फक्त एकत्र आली नाही तर त्यांनी या भागातील पूर्वीचा शैक्षणिक असलेला हा गाव पुन्हा या गावाला गतवैभव प्राप्त व्हावे. या दृष्टीने त्यांची असलेली संकल्पना निश्चितच पूर्ण होईल. या शाळेत येत्या शैक्षणिक वर्षापासून नवीन उपक्रम, नवीन अभ्यासक्रम सुरू केले जातील. त्यासाठी माजी विद्यार्थ्यांचा हातभारही आवश्यक आहे. जुन्या – नव्या गुरुजनांचा केलेला सन्मान लाख मोलाचा आहे ,असे गौरव उद्गार त्यांनी काढले.
यावेळी या बॅचने गुरुजनांचा सन्मान कार्यक्रम करताना आगळावेगळा असा संदेश दिला आहे. सर्व उपस्थित गुरुजनांचा सन्मान राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देऊन गुरु – शिष्याचे नातं अधिक दृढ केलं. गुरुजनांच्या हस्ते उपस्थित माजी विद्यार्थी यांनाही छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो देऊन सर्व विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी अॅड. संतोष सावंत यांनी केले. यावेळी त्यांनी या शाळेच्या आतापर्यंतच्या जडणघडणीचा संपूर्ण आढावाही घेतला. संपूर्ण दशक्रोशीत कलंबिस्त हायस्कूल ही नावाजलेली शाळा म्हणून व आदर्श शाळा ओळखली जात आहे. सैनिकी गावामध्ये उदात्त हेतूने संस्थाध्यक्ष शिवाजी सावंत व त्यांच्या टीमने या भागात शाळा सुरू केली आणि त्या काळात ग्रामीण भागात शैक्षणिक हब उभे केले. ही शैक्षणिक विकासाची नांदी आजच्या नव्या धर्तीवर पुन्हा एकदा या भागात एक नवचैतन्य निर्माण करावे. संस्था जे उपक्रम आणि जे प्रकल्प उभे करतील, त्याला आमचा सर्वांचा पाठिंबा असेल. या भागात पशुसंवर्धन, कृषी यांसारखे व्यवसायभिमुख अभ्यासक्रम सुरू करणे आवश्यक आहे, अशी इच्छा व्यक्त केली. यावेळी उपस्थित माजी विद्यार्थी उद्योजक संदीप सावंत, देविदास पास्ते, नारायण सावंत, काशीराम म्हाडगूत, उत्तम कदम, गोविंद कदम, दत्ताराम पवार, शिल्पा पास्ते, विजया सावंत, सुरेखा गावडे – सावंत, रवींद्र जंगम यांनीही आपण शाळेत असताना आम्हाला सर्व गुरुवर्य यांनी जो संदेश दिला होता, त्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो. आमच्या आताच्या यशात या शाळेतील शिक्षकांचा फार मोठा वाटा आहे. त्या गुरुजनांचे चरणस्पर्श घ्यावेत, या दृष्टीने आम्ही एकत्र येत त्यांचा हा गौरव गुरु – शिष्याचे नाते पुढे टिकावे आणि येत्या नव्या पिढीला एक नवा आदर्श निर्माण व्हावा, या हेतूने आम्ही एकत्र आलोत. त्यांचा केलेला सन्मान हा खरा अर्थाने आम्ही गुरु शिष्याच्या नात्याला केलेला सलाम आहे, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. शालेय जीवनातील आपले अनुभव कथन केले.
शाळेला निश्चितपणे सर्वतोपरी मदत करण्याचे ठरवण्यात आले. यावेळी यंदाच्या वर्षी दहावीत मराठी, इंग्रजी व इतिहास नागरीक शास्त्रात शंभर पैकी 100 गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्याचाही संकल्प करण्यात आला. यावेळी शिक्षक किशोर वालावलकर, विलास चव्हाण, सौ. सुषमा सावंत – कविटकर, सौ. श्रद्धा साळगावकर, पराडकर, रवीकमल सावंत आदींचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. उपस्थितांचे स्वागत नारायण सावंत, शिल्पा पास्ते, उत्तम कदम यांनी केले.


