एसटीसह बांधकाम विभाग सुशेगाद; अन्यथा वृक्षारोपण करू,नईम मेमन यांचा इशारा.!
सावंतवाडी: एसटी महामंडळाच्या इलेक्ट्रीक वायर टाकण्यासाठी बाहेरचावाडा परिसरात खोदकाम केल्यानंतर भर रस्त्यात तसाच ठेवण्यात आलेला मातीचा मोठा ढिगारा अपघाताला निमंत्रण देत आहे.
याबाबत शरद पवार राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष नईम मेमन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून तात्काळ हा ढिग काढुन रस्ता पुर्ववत करा. अन्यथा त्या ठिकाणी वृक्षारोपण करू, असा इशारा त्यांनी एसटीसह सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.याबाबत त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभाग आणी एसटी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

एसटी प्रशासनाकडुन इलेक्ट्रीक वायर टाकण्यासाठी खड्डे खोदण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी बसस्थानकापासून ते कोलगाव पर्यत रस्ते खोदण्यात आले आहेत. काही ठिकाणी गटारात खोदाई करण्यात आले असून ते अर्धवट बुजविण्यात आले आहे. तर बाहेरचावाडा लतिफ बेग यांच्या घरासमोर खणलेल्या खड्ड्यावर मोठा मातीचा ढिग करुन ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अनेक वाहन चालकांच्या तो गाडीच्या तळाला लागत आहे. तर दुचाकी चालकांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. याबाबत वारंवार दोन्ही प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. मात्र तो ढिग तसाच आहे. त्यामुळे याबाबत तात्काळ योग्य ती भूमिका घ्यावी, अन्यथा त्या ठिकाणी शरद पवार राष्ट्रवादीच्या माध्यमातून वृक्षारोपण करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.


