सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र शासन कृषी विभाग सिंधुदुर्गद्वारा जिल्हा कृषी पुरस्कार नियोजनबद्ध व्यवस्थापन करून आंबा उत्पादनामध्ये नवा विक्रम प्रस्थापित करून जगात हापूस आंब्याची प्रथम पेटी पाठविण्याचा विश्वविक्रम केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मानाचा तुरा रोवून डॉ. उत्तम सूर्यकांत फोंडेकर यांनी आंबा बागायतदार म्हणून विलक्षण कामगिरी केल्याबद्दल त्यांना 2024 सालाचा राज्य शासनाचा जिल्हा कृषी पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम स्वरूपात प्रदान करण्यात आले. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या भाषणात उत्तम फोंडेकर यांनी सिंधुदुर्गचे नाव जागतिक स्तरावर कोरल्याबद्दल ते आपले कृषी क्षेत्रातील ‘माईलस्टोन’ असून त्यांनी हापूस आंबा संदर्भात अटकेपार झेंडे लावले आहेत, असे सांगत फोंडेकर यांना शुभेच्छा प्रदान केल्या.

दरम्यान उत्तम फोंडेकर यांच्या या पुरस्काराबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक लक्ष्मण खुरकुटे, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल व इतर प्रशासकीय अधिकारी मंडळी व कर्मचारी बांधव उपस्थित होते.


