नवी दिल्ली : नवी दिल्लीत भाजपने तब्बल 42 जागांवर मुसंडी मारली आहे. तर आम आदमी पक्षाला 24 जागा मिळाल्या आहेत. तसेच काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही. त्यामुळे तब्बल 27 वर्षांनी दिल्लीत भाजपचे कमळ फुलले आहे. दिल्लीत भाजपची एकहाती सत्ता येणार असल्याचे निश्चित झाले आहे. दिल्लीत आपचा पराभव होताच सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिल्ली निवडणुकांवर प्रतिक्रिया दिली आहे.
अण्णा हजारे यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दिल्लीत आपचा पराभव का झाला, याबद्दल सविस्तर भाष्य केले. मी अरविंद केजरीवाल यांना सांगितलं होतं. पण त्यांनी दारुवर लक्ष केंद्रीत केलं. त्यांच्या डोक्यात पैशाची, सत्तेची हवा गेली. त्यामुळे त्यांचा पराभव झाला, असे अण्णा हजारे म्हणाले.
मी नेहमी म्हणतो की कोणत्याही उमेदवाराकडे स्वच्छ विचार, स्वच्छ चारित्र्य आणि त्यागाची भावना असायला हवी. या गुणांवरूनच मतदारांचा त्या उमेदवारावर विश्वास बसतो. ज्यावेळेला ते दारुचे दुकानं काढायची, दारुचे परवाने द्यायचे हे विचार जेव्हा त्यांच्या मनात आले त्यावेळेला ते डाऊन झाले. जागरुक मतदार हा आजच्या लोकशाहीचा आधार आहे. आताचा मतदार हा जागरुक झालेला आहे. हे लोक दारुचा विचार करतात हे पाहिलं आणि त्यांनी नकार दिला. त्यामुळे ते डाऊन झाले, असे अण्णा हजारे म्हणाले. ज्यावेळी पक्ष नव्हता आणि ते जेव्हा माझ्यासोबत आले तेव्हा मी त्यांना सुरुवातीपासून जनतेची सेवा करा असं सांगत आलो. फळाची अपेक्षा न करता केलेले कर्म ही ईश्वराची पूजा असते. अशीच पुजा तुम्ही करत राहा. तुम्हाला कोणी हटवणार नाही. सुरुवातीला बरं वाटलं. नामधाऱ्यांच्या डोक्यात दारुचे दुकान, दारुचे लायसन्स शिरले आणि घोटाळा झाला. त्यानंतर मग दारु डोळ्यासमोर आली, धन आले, दौलत आली. मग सगळं बिघडलं, असेही अण्णा हजारेंनी सांगितले.


