मुंबई : केंद्राच्या पंतप्रधान सूर्यघर योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर असल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी (दि.१४) त्यांच्या सोशल मीडिया एक्स अकाऊंटवरून दिली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे की, “पंतप्रधान सूर्यघर योजनेंतर्गत आतापर्यंत 10.09 लाख सौर ऊर्जा प्रकल्पांचे इंस्टॉलेशन झाले आहे. या एकूण इंस्टॉलेशन्सपैकी महाराष्ट्राने 1,92,936 इंस्टॉलेशन्स पूर्ण करून देशात दुसरे स्थान मिळवले आहे. 2026-27 पर्यंत 1 कोटी कुटुंबांपर्यंत ही योजना पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे. आगामी काळातही महाराष्ट्र आपले महत्त्वपूर्ण योगदान देत राहील”, असेही त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देशात ‘पंतप्रधान सूर्यघर योजने’चा शुभारंभ 13 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आला. या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत 10 मार्च 2025 पर्यंत देशभरात एकूण 10.09 लाख सौर ऊर्जा प्रकल्पांचे इंस्टॉलेशन पूर्ण झाले असून, हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे, असेही त्यांनी एक्स पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे. पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना ही भारत सरकारने सुरू केलेली महत्त्वाकांक्षी योजना आहे. रुफटॉप सोलरद्वारे देशातील एक कोटी घरांना मोफत वीज पुरवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
२०२४-२५ च्या अर्थसंकल्पात ही योजना जाहीर करण्यात आली होती. पीएम सूर्यघर योजनेंतर्गत 300 युनिट पर्यंत मोफत वीज लाभार्थी व्यक्तीला मिळणार आहे. केंद्र सरकारने या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभार्थ्याला 60 %पर्यंत सबसिडी केंद्र शासन तर्फे देण्याची तरतूद केली आहे.पंतप्रधान सूर्यघर योजना ही देशातील एक कोटी लोकांसाठी आहे.


