नवी दिल्ली : भारतातील आघाडीची हवामान विषयक अंदाज करणारी संस्था स्कायमेटनं मान्सून 2025 साठीचा अंदाज जाहीर केला आहे. स्कायमेटनं मान्सूनचा येणारा हंगाम सामान्य राहील, असा वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत मान्सूनचा पाऊस सरासरीच्या 103 टक्के होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये 5 टक्क्यांची वाढ किंवा घट होऊ शकते. जून ते सप्टेंबर या कालावधीत दीर्घकालीन सरासरी 868.6 एमएम पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
स्कायमेटचे जतिन सिंह यांच्या मते, ला निना या हंगामात कमकुवत आणि संक्षिप्त असेल. ला निनाचे चिन्ह आता धुसर होत आहे. मान्सूनवर विपरीत परिणाम करण्याऱ्या एलनिनोची शक्यता नाकारण्यात आली आहे. एलनिनो दक्षिणी दोलन फार न्यू्ट्रल राहणार असल्यानं भारतात मान्सूनच्या पावसावेळी तो प्रभावी घटक ठरणार आहे. ला निना कमकुवत असणं आणि एलनिनो प्रभावी नसल्यानं मान्सूनचा पाऊस चांगला होऊ शकतो. हिंदी महासागरातील स्थिती एलनिनो प्रभावी न होण्यासाठी उपयोगी ठरु शकते. त्यामुळं मान्सूनचा पाऊस चांगला राहू शकतो, असा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे. एलनिनो दक्षिणी दोलन प्रभावी नसणं त्याचवेळी आयओडी सकारात्मक असल्यानं चांगला पाऊस येऊ शकतो. मान्सूनच्या पहिल्या टप्प्यापेक्षा दुसऱ्या टप्प्यात चांगला पाऊस होऊ शकतो, असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.
एलनिनोशिवाय इतर घटक देखील मान्सूनवर परिणाम करत असतात. आयओडी (इंडियन ओसियन डायपोल) सध्या प्रभावहीन असून यामुळं मान्सूनच्या सुरुवातीसाठी सकारात्मक चित्र आहे. एलनिनो दक्षिणी दोलन आणि आयओडी दोन्ही मान्सूनच्या प्रवासावर परिणाम करतात. चार महिन्यांपैकी अर्धा कालावधी झाल्यानंतर मान्सूनला अधिक वेग मिळू शकतो.
स्कायमेटच्या अंदाजानुसार पश्चिम आणि दक्षिण भारतात चांगला पाऊस होईल. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात पुरेसा पाऊस होईल. पश्चिम घाटात प्रामुख्यानं केरळ, कर्नाटकचा किनारपट्टीचा भाग आणि गोव्यात अधिक पाऊस होईल. उत्तरेकडील राज्य आणि पर्वतीय भागात सरासरीच्या पेक्षा कमी पाऊस होईल.
जून महिन्यात सरासरीच्या 96 टक्के म्हणजे सामान्य पाऊस राहू शकतो. या महिन्यात 165.3 मिलीमीटर पावसाची नोंद होईल. जुलै महिन्यात 1023 टक्के पाऊस होईल तर 280.5 मिलीमीटर पावसाची नोंद होईल असा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे. ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 108 टक्के पाऊस होऊ शकतो. या महिन्यात 254.9 मिलीमीटर पाऊस होऊ शकतो. सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या 104 टक्के पावसाची नोंद होऊ शकते. तर,167.9 मिलीमीटर पावसाची नोंद होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पाऊस कसा मोजतात?
भारतीय हवामान विभागाने पाऊस मोजण्याच्या पाच श्रेणी ठरवल्या आहेत. सरासरीच्या 90 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस म्हणजे अपुरा पाऊस समजला जातो. दुसऱ्या श्रेणीत 90 ते 95 टक्के म्हणजे सरासरीपेक्षा कमी पाऊस, तर तिसऱ्या श्रेणीत 96 ते 104 टक्के म्हणजे सामान्य सरासरी इतका पाऊस समजला जातो. पुढील दोन श्रेणी सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 105 ते 110 टक्के आणि 110 टक्क्यांच्या पुढे अधिक पाऊस म्हणजे सर्वाधिक पाऊस समजला जातो.
ADVT –



