सावंतवाडी : आज संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर जगात ज्या योजनेने धुमाकूळ घातला ती ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू असून एकीकडे मात्र आपल्या उपचारासाठी आलेल्या एका तरुण बहिणीला मृत्यूच्या दारात पोहोचवण्याचं भयंकर धाडस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा उपजिल्हा रुग्णालयाने केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असा की, धाकोरा येथील युवती वैष्णवी मिलन आसोलकर (वय वर्षे 23) ह्या उपचारार्थ शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात काल दिनांक 21 रोजी दाखल झाल्या. मात्र तेथील उपचार करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये एक्सपायर्ड (मुदत संपलेली) झालेली सलाईन त्यांना लावली आणि त्यानंतर त्यांचा त्रास वाढू लागला. वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा उपजिल्हा रुग्णालयातून एका रुग्णावर उपचार करताना सोडियम क्लोराइड इंजेक्शन (सलाईन)चा वापर केला गेला ते फेब्रुवारी 2024 मध्ये मुदत संपलेलं असल्याचे निदर्शनास आले आहे. सरकारी वापरासाठी अशी नोंद असलेल्या सदर इंजेक्शनवर मार्च 2022 अशी उत्पादन तारीख असून फेब्रुवारी 2024 ही मुदतपूर्तीची तारीख असल्याचे दिसते. ज्या सरकारी रुग्णालयांवर गोरगरीब रुग्ण अवलंबून असतात अशा जबाबदार रुग्णालयांमध्ये अशाप्रकारे होणारी बेपर्वाई म्हणजे गोरगरीब रुग्णांच्या जीवाशी चाललेला खेळ आहे. एखादा खाण्याचा पदार्थ देखील बाजारात घेताना सर्रास आजकाल सर्व त्याची एक्सपायरी तारीख पाहून घेतात कारण ते पोटात जाणार असतं, मग रुग्णाच्या शरीरात डायरेक्ट जाणाऱ्या इंजेक्शनची तारीख जबाबदार कर्मचाऱ्यांनी कशी काय पाहिली नाही? गोरगरीब रुग्णाच्या जीवाची काही किंमतच नाही असा रुग्णालयातील सरकारी कर्मचाऱ्यांचा समज आहे का? या उपजिल्हा रुग्णालयाला दोन वर्षांपूर्वीच्या औषधांचा पुरवठा केला गेला आहे का? असे अनेक प्रश्न सदरचा बेजबाबदार प्रकार घडल्यानंतर उपस्थित होत आहेत. प्रशासनाने सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित बेजबाबदार दोषी कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
याबाबत तात्काळ दखल घेत शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष आणि विद्यमान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय नारायण उर्फ बबन राणे यांनी उपजिल्हा रुग्णालय शिरोडा येथे धाव घेतली. तसेच धाकोर गावाच्या सरपंच स्नेहा निलेश मुळीक, शिरोडा गावाच्यासरपंच मॅडम, शिरोड्याचे माजी सरपंच मनोज उग्वेकर, ग्रामपंचायत सदस्य धानजी मॅडम, धाकोरा माजी उपसरपंच विठ्ठल मुळीक, पोलीस पाटील सौ. पोखरे मॅडम, धाकोरा गावातील अनेक ग्रामस्थ, सिद्धेश गोवेकर, गौरेश गोवेकर, गणेश आसोलकर, सागर मुळीक, सामाजिक कार्यकर्ते निलेश मुळीक, रवींद्र मुळीक, सुहास साटेलकर, दीपा गोवेकर तसेच शिरोडा आणि धाकोरे येथील शेकडो ग्रामस्थ, पोलीस कर्मचारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले.

दरम्यान बबन राणे यांनी शिरोडा येथील उपचार करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तात्काळ एक्सपायर झालेली औषधी नष्ट करा, नवीन औषधीचा स्टॉक आणा आणि रुग्णांच्या जीवाशी खेळू नका. अन्यथा तुमच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असा समज दिला. यावेळी जमलेल्या व संतप्त झालेल्या पालक, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांना बबन राणे यांनी शांत राहण्याचे आवाहन करत सदर युतीवर योग्य तो उपचार करण्याची सूचना केली. मात्र शिरोडा उपजिल्हा रुग्णालयाच्या या भोंगळ कारभाराबद्दल शिरोडा, आजगाव, धाकोरा, आरवली येथील आणि पंचक्रोशीतील रुग्ण शिरोडा रुग्णालयात आल्यानंतर धोक्याचे आहे, ही गोष्ट मात्र सदर घटनेवरून स्पष्ट होते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.


