सावंतवाडी : वाफोली येथील पाटकर पुलाजवळील रस्ता चार-पाच दिवस पाऊस सुरू असल्याने रस्त्यावर जीवघेणे खड्डे व प्रचंड चिखल साचला आहे. संबंधित विभागाने याची तात्काळ दखल घेऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे. रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्यासाठी मातीची भरीव टाकून उंची वाढवली असून त्या ठिकाणी चिखलमय झाले आहे.

रहदारी करणाऱ्या आबाल वृद्ध वाहनधारक यांना त्याचा नाहक त्रास होत आहे. नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. या रस्त्यावर रात्रंदिवस रहदारी मोठ्या प्रमाणात होत असते. रात्रीच्या वेळी तसेच दिवसासुद्धा अपघात होण्याची शक्यता आहे. नवख्या वाहनाला मोठ्या प्रमाणात चिखल खड्डे पडल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होण्याचे शक्यता आहे. कोणतेही मोठी हानी होण्याअगोदर सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालक, प्रवासी नागरिकांमधून होत आहे. या रस्त्यावरून ज्येष्ठ नागरिक लहान मुलं प्रवास करत असतात. यांचा त्रास सहन करावा लागतो.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक परब तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ही मागणी लवकरात लवकर पूर्ण व्हावी किंवा कुठलीही हानी न होता या ठिकाणी योग्य ते काम व्हावे, अशी विनंती सार्वजनिक बांधकाम विभागाला करण्यात आली आहे.


