सावंतवाडी : येथील नगरपरिषदेमार्फत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त व माझी वसुंधरा अभियानांतर्गत ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम राबविण्यात आला. एनयुएलएम महिला बचत गट, मुख्याधिकारी श्रीम. अश्विनी पाटील, नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत सावंतवाडी शहरात माठेवाडा मदारी रोड खुल्या जागेमध्ये विविध भारतीय प्रजातीची लागवड करण्यात आली.
वृक्षारोपण कार्यक्रमावेळी पर्यावरणाविषयी जनजागृती व प्लास्टीक प्रदुषण निर्मुलन या विषयावर माहीती देण्यात आली. तसेच माझी वसुंधरा अभियानांतर्गत हरित शपथ देण्यात आली. वृक्षारोपण कार्यक्रमाच्यावेळी साग व महोगनी या प्रजार्तीची 50 रोपांची लागवड करण्यात आली. सावंतवाडी नगरपरिषदेच्या विविध खुल्या जागेत 1 हजार झाडे लावून जगविण्याचे उदीष्ट ठेवण्यात आलेले आहे. या वृक्षारोपण कार्यक्रमावेळी नगरपरिषद मुख्याधिकारी श्रीम. अश्विनी पाटील, नगरपरिषद अधिकारी, विभाग प्रमुख व कर्मचारी तसेच एनयुएलएम महिला बचत गट व शहरातील नागरीक उपस्थित होते.


