Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

वाचकांना पुस्तकापर्यंत नेण्याची ताकद कै. जयवंत दळवी यांच्या साहित्यात ! : सतीश पाटणकर ; आरवली येथे ‘आत्मचरित्राऐवजी’ या पुस्तकाच्या चर्चेने कै. जयवंत दळवी यांच्या साप्ताहिक चर्चेचा समारोप, आजगांव येथील ‘साहित्य प्रेरणा कट्टा’ व शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजन.

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आजगांव येथील साहित्य प्रेरणा कट्टा आणि शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयाच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध साहित्यिक कै. जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून गेले वर्षभर चालू असलेल्या दळवींच्या पुस्तकांवरील साप्ताहिक चर्चेचा समारोप नुकताच ‘आत्मचरित्राऐवजी’ या पुस्तकाच्या चर्चेने कै. जयवंत दळवी यांच्या आरवली येथील जन्मस्थानी झाला.

या समारोप सोहळ्यास नामवंत साहित्यिक तथा महाराष्ट्र शासनाचे निवृत्त माहिती अधिकारी सतीश पाटणकर हे प्रमुख अतिथी म्हणून तर कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष दीपक पटेकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. कै. जयवंत दळवी यांचे पुतणे संदीप दळवी सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते. साहित्य प्रेरणा कट्ट्याचे समन्वयक तथा नामवंत साहित्यिक विनय सौदागर व खटखटे ग्रंथालयाचे कार्यवाह सचिन गावडे हे देखील यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

वाचकांना पुस्तकापर्यंत नेतो, तो खरा साहित्यिक असतो आणि कै. जयवंत दळवी हे याच वर्गात मोडणारे साहित्यिक होते, असे प्रतिपादन सतीश पाटणकर यांनी यावेळी बोलताना केले. दळवी यांच्या सहवासातील काही हृद्य आठवणीही त्यांनी यावेळी कथन केल्या. कै. दळवी यांच्या तब्बल तीस पुस्तकांवर चर्चा करून त्यांची जन्मशताब्दी नाविन्यपूर्ण आणि अर्थपूर्ण पद्धतीने साजरी केल्याबद्दल साहित्य प्रेरणा कट्टा आणि खटखटे ग्रंथालयाचे त्यांनी अभिनंदन केले.

       

जे साहित्य दर्जेदार असतं वाचकाला सहज समजेल असं सोपं असतं, अशा साहित्यावर वाचक प्रेम करतात, हे जयवंत दळवी यांच्या साहित्यावरून लक्षात येते, असे दीपक पटेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. वर्षभर चालवलेल्या पुस्तक चर्चेबद्दल त्यांनी आयोजकांचे कौतुक केले.
अध्यक्षपदावरून बोलताना संदीप दळवी यांनी कै.जयवंत दळवींच्या मिश्किल स्वभावाचे काही किस्से सांगून,त्यांना कुटुंबाविषयी असलेला जिव्हाळा दर्शवणाऱ्या त्यांच्या एका कौटुंबिक स्वरूपाच्या पत्राचे वाचन केले.

पुस्तक चर्चेच्या मालिकेतील ‘आत्मचरित्राऐवजी’ या तिसाव्या पुस्तकातील माझे नाट्यक्षेत्रातील पडेल पदार्पण’, ’आपुले मरण पाहिले म्या डोळा’, ‘माझ्या कुटुंबात मी’ व ‘त्या चौघीजणी’ या लेखांवर प्रा.गजानन मांद्रेकर,सरोज रेडकर, स्नेहा नारिंगणेकर व सचिन दळवी यांनी सविस्तर विवेचन केले.

गेले वर्षभर खटखटे ग्रंथालयात चाललेल्या या पुस्तक चर्चेत विशेष सहकार्य केल्याबद्दल ग्रंथालयाचे कार्यवाह सचिन गावडे, ग्रंथपाल अर्चना लोखंडे, साहाय्यक ग्रंथपाल प्राची पालयेकर, लिपिक अनिष्का रगजी, कार्यालयीन कर्मचारी सुधा साळगांवकर व ग्रंथालयाची वाचक विद्यार्थिनी श्रीपल्ली लोखंडे यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

तद्नंतर झालेल्या खुल्या सत्रात डॉ. प्रसाद साळगांवकर, ॲड. नकुल पार्सेकर, भालचंद्र दीक्षित, प्रकाश रेगे, संजीव पै व प्रा. रूपेश पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.


विनय सौदागर यांनी स्वागत व प्रास्ताविक करून मान्यवरांचा परिचय केला. वर्षभर कै. जयवंत दळवी यांच्या तीस पुस्तकांवर चर्चा घडवून आणण्याचा उपक्रम महाराष्ट्रात केवळ आरवली, शिरोडा परिसरातच झाल्याचे त्यांनी प्रास्ताविकात आवर्जून नमूद केले. शेवटी सचिन गावडे यांनी ऋणनिर्देश केला.

येत्या सप्टेंबर महिन्यापासून ‘कै.जयवंत दळवी स्मृती मासिक साहित्य चर्चा’ या नावाने ही चर्चा चालू राहील, असे यावेळी जाहीर करण्यात आले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी कै.जयवंत दळवी यांची सून उर्मिला दळवी यांनी विशेष परिश्रम घेतले.

या कार्यक्रमास मांद्रे, गोवा येथील ‘साहित्य संगम’चे अध्यक्ष सुभाष शेटगांवकर, तसेच ज्येष्ठ सदस्य दिलीप मेथर, महेंद्र परब व प्रगती परब उपस्थित होते.

(छायाचित्र – ज्येष्ठ साहित्यिक कै. जयवंत दळवी जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून वर्षभर चालू असलेल्या साहित्य चर्चेच्या समारोप कार्यक्रमात बोलताना सतीश पाटणकर. सोबत इतर मान्यवर.)
‘साहित्य प्रेरणा’च्या कार्यक्रमात ॲड. नकुल पार्सेकर यांचे वक्तव्य

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles