सिंधुदुर्ग : गोवा येथील विविध आस्थापनांमध्ये काम करणारे सिंधुदुर्गातील तसेच महाराष्ट्रातील अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांनी आज माजी खासदार विनायक राऊत, सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांची भेट घेऊन आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत निवेदन सादर करून न्याय मिळवून देण्याबाबत विनंती केली. यावेळी प्रतिनिधी म्हणून दत्तप्रसाद राऊळ, विठ्ठल नाईक, सुयोग पालव, राजेंद्र सरनोबात,दिनेश खोटावले यांनी विनायक राऊत यांची भेट घेत आपल्या व्यथा मांडल्या.
आपल्या निवेदनात सदर कामगार म्हणतात की, गोवा येथे सिंधुदुर्गातील तसेच इतर महाराष्ट्राचे एकूण 2-3 हजार कामगार गोवा राज्यामधे काम करत आहेत. गोवामध्ये काम करणार्या महाराष्ट्राच्या कामगरांनी गोवा पणजी येथील आझाद मैदानावर आंदोलन करत गोवा सरकारने गेल्या 2 वर्षांपासून फार्मास्युटिकल कामगारांवर लावलेला एस्मा अॅक्ट मागे घ्यायची मागणी केली. दोन तीन वेळा आंदोलन करूनसुद्धा सरकारने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. गोव्यामधील भाजप सरकार कंपनी व्यवस्थापनाच्या मर्जीनुसार काम करत असून येथील सिप्ला, मार्कसन, तेवा, अशा अनेक फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये काम करणार्या कामगारांना कामावरून काढून टाकत आहेत. तसेच त्यांची बदली हिमाचल प्रदेश, सिक्कीम अशा राज्यांमध्ये करत आहे. कंपनीमध्ये विनाकारण कामगारांचा छळ तसेच कंपनी व्यवस्थापनाकडून कामगारांना विविध मार्गांनी धमकी देण्याचा प्रकार सुरू आहे.
गोव्यातील भाजप सरकारने गेल्या 2 वर्षापासून कामगारांवर जबरदस्ती एस्मा कायदा लावत कामगारांचा आंदोलन करण्याचा हक्क काढून घेतला आहे. या एस्मा अॅक्टचा गैरवापर गोव्यातल्या फार्मास्युटिकल कंपनी करत आणि कामगारांना कामावरून काढत आहे. याचा फटका सिंधुदुर्गातील 60 पेक्षा जास्त कामगारांना बसला असून कंपनीने कोणतीही पूर्व सूचना न देता कामावरून कमी केले आहे. तसेच काहीजणांजी बदली परराज्यात केली आहे. त्यामुळे या सर्व कामगारांवर सध्या मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
दरम्यान, या सर्व अन्यायग्रस्त कामगारांनी आपल्या भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून कंपनी व्यवस्थापनाविरोधात लढा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, अद्यापही कोणताही निर्णय झालेला नाही. तरी आपण याप्रश्नी शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा करून सिंधुदुर्गातील कामगारांना न्याय द्यावा, ही विनंती.
आम्हाला आशा आहे की, आपण आमचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न कराला. आम्ही सर्व सिंधुदुर्ग तसेच इतर महाराष्ट्रातील कामगार आपले सदैव ॠणी राहू.
दरम्यान माजी खासदार विनायक राऊत यांनी अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आपण तत्पर असून योग्य ते सहकार्य करू असे आश्वासन दिले.


