कुडाळ : कोकण रेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष समिती सिंधुदुर्गच्या माध्यमातून पुकारलेल्या १ ऑगस्ट रोजी च्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आज कुडाळ रेल्वे स्थानकात समस्यांबाबत समितीचे पदाधिकारी व स्थानिक प्रवासी, रिक्षा संघटना सोबत भेट देऊन चर्चा केली. रेल्वे स्थानकातील भेटी दरम्यान प्रवासी निवारा शेड, प्लॅटफॉर्म वर वाढलेले गवत, छप्पर कोसळण्याच्या स्थितीत असलेले निवारा शेड, पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी असलेले अस्वच्छता, प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर वाढलेली झाडे, बंद असलेली वायफाय सुविधा असे अनेक प्रकार समितीच्या माध्यमातून व प्रवाशांच्या माध्यमातून रेल्वे स्थानक पाहणी करण्यासाठी आलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. धक्कादायक प्रकार म्हणजे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्लॅटफॉर्म वरील निवारा शेडच्या मागे दरड कोसळण्याच्या स्थितीत असून सुद्धा अजूनही कोणतीही उपाययोजना केली नाही. रेल्वे प्रशासन एखाद्या प्रवाशाचा जीव जाण्याची वाट बघत आहे का? असा प्रश्न प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला.

पाऊस मोठ्या प्रमाणात होतो कुडाळ शहरात पुर परिस्थिती निर्माण होते , त्यावेळी रेल्वे स्थानकाच्या बाजूने जाणारा मार्ग हा पर्याय मार्ग म्हणून निवडला जातो , अशावेळी या मार्गाची डागडुजी न केल्याने ह्या मार्गावर अपघाताचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहे, असेही स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले व लवकरात लवकर उपाययोजना करून या रस्त्याची डागडूजी करावी अशी ही मागणी करण्यात आली. या भेटी दरम्यान समितीचे अध्यक्ष प्रकाश पावसकर, माजी सभापती सुनील भोगटे, माजी नगराध्यक्ष आफ्रिन करोल, समितीचे समन्वयक नंदन वेंगुर्लेकर, सचिव अजय मयेकर कसाल रेल्वे स्थानक संघर्ष समिती सचिव साईनाथ आंबेरकर, स्वप्निल गावडे, कुडाळ रेल्वेस्टेशन कार्यकारणी सदस्य श्री. वैभव घोगळे , श्रेया घोगळे, श्री.ठाकूर व रिक्षा संघटनेचे पदाधिकारी, रेल्वे प्रवासी उपस्थित होते.


