सावंतवाडी : चष्मा वाटप,सेट टॉप बॉक्स, मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलप्रमाणेच सावंतवाडी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार शक्तीपीठ महामार्गासंबंधी जनतेला अजून एक गाजर दाखवत आहेत. ते दिशाभूल करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गाचा मार्ग बदलून आंबोलीवरून मळगाव किंवा झिरो पाॅईंट येथे आणि तेथून तिलारी आणि रेडी जेटीपर्यंत नेण्याची कशी विनंती त्यांनी सरकार दरबारी केली?, हे ते सांगत आहेत.
या सर्व भुलथापा आहेत आणि जनतेचा त्यांच्या वक्तव्यावर आता अजिबात विश्वास राहिलेला नाही, अशी टीका उबाठा सेनेचे जिल्हा प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केली आहे.
डॉ. जयेंद्र परुळेकर पुढे म्हणतात, मुळात ज्या सरकारच्या कार्यकाळात राज्यातील कंत्राटदारांचे ९० हजार कोटी रुपये आणि जिल्ह्यातील कंत्राटदारांचे ५०० कोटी रुपये थकीत आहेत आणि कंत्राटदारांवर आत्महत्या करण्याची पाळी आली आहे त्या राज्यात ८६ हजार कोटी रुपयांचा हा महामार्ग कोणाला हवा आहे?
नागपूर ते रत्नागिरी महामार्ग असताना अजून एक महामार्ग विदर्भ कोकणाला जोडण्याचा हा कोणाचा द्रविडी प्राणायाम आहे?
हा रस्ता जनतेसाठी किंवा पर्यटनासाठी आहे की सत्ताधारी राज्यकर्त्यांचे उखळ पांढरे करण्यासाठी आहे?
गमतीशीर बाब म्हणजे भविष्यात सावंतवाडी हा महाराष्ट्र राज्यातील असा एकमेव तालुका असेल ज्या तालुक्यातून एक दोन नव्हे तर तब्बल सहा महामार्ग जातील…सतरा वर्षे पुर्णत्वाच्या प्रतिक्षेत असलेला मुंबई गोवा महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग, अनेक वर्षे प्रस्तावित सागरी महामार्ग, संकेश्वर बांदा महामार्ग, प्रस्तावित पनवेल बांदा महामार्ग आणि प्रस्तावित सह्याद्री महामार्ग…!
एवढे महामार्ग एकाच तालुक्यातून?
मग सगळ्या जनतेला सरसकट येथून दुसरीकडे स्थलांतरित करण्याचाच घाट घातला जातोय काय?
जनतेच्या खऱ्या समस्या वेगळ्याच आहेत. त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले जात आहे.
सतत खंडित होणारा वीजपुरवठा,युवा वर्गात वाढत चाललेली ड्रग्सची व्यसनाधीनता, आरोग्य व्यवस्थेचे वाजलेले तीन तेरा, परप्रांतीय घशात घालत चाललेल्या मोठमोठ्या जमिनी असे अनेक गंभीर प्रश्न असताना विद्यमान आमदारांचे तिथे अजिबात लक्ष नाहीये. खरंतर त्यांचं मतदारसंघाकडेच लक्ष नाहीये, असा घणाघात डॉ. परुळेकर यांनी केलाय.


