Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

कोकणातील मराठ्यांना EWS आरक्षण द्यावे ! : ॲड. सुहास सावंत यांची मागणी.

सावंतवाडी : कोकणातील मराठा समाजाला आरक्षणाचा फायदा व्हावा यासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आरक्षण लागू करून शिक्षण आणि नोकरीत त्याचा लाभ मिळावा, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष ॲड. सुहास सावंत यांनी केली आहे.

हैदराबाद आणि सातारा गॅझेट कोकणाला लागू होण्याची शक्यता कमी असल्यामुळे आणि बहुतांश मराठा कुणबी दाखले घेण्यास तयार नसल्याने ही मागणी करण्यात आली आहे.
अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित मराठा व्यावसायिक मेळावा आणि भवानी ऑनलाईन सर्व्हिसेस दालनाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. हे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, ठाकरे शिवसेना विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, ॲड. सुहास सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे आणि दिनेश गावडे, मराठा महासंघ तालुका अध्यक्ष अभिषेक सावंत, विनायक गायकवाड, मनोज घाटकर, आशिष काष्टे, वैभव जाधव, आनंद नाईक, विनोद सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

ॲड. सावंत यांनी सांगितले की, मराठा व्यावसायिक उद्योजकांची ऑनलाइन डिरेक्टरी तयार करण्यात आली आहे. सर्वांनी यात नोंदणी करून सहभागी व्हावे. आजच्या कृत्रिम बुद्धिमत्ता युगात नोकऱ्यांवर परिणाम होत आहे. त्यामुळे कौशल्य प्रशिक्षण घेतलेले तरुणच टिकतील. यासाठी मराठा समाजातील तरुणांना कौशल्य प्रशिक्षण आणि आवश्यक माहिती दिली जाणार आहे. शैक्षणिक उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना विविध कोर्सेसची माहिती पुस्तकांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाईल. उद्योजक डिरेक्टरीच्या माध्यमातून सर्वजण एकत्र आल्यास मराठा व्यावसायिक अधिक चांगल्या प्रकारे प्रगती करतील, असेही ते म्हणाले.

ॲड. सावंत यांनी कोकणातील मराठा समाज आरक्षणाच्या बाबतीत गंभीर नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, कोकणातील मराठा समाज आरक्षणाबाबत संभ्रमावस्थेत आहे. बहुतेक ९६ कुळी मराठा समाज असल्याने ते कुणबी दाखले घेण्यास तयार नाहीत आणि त्यांना हैदराबाद व सातारा गॅझेटचाही फायदा होणार नाही. त्यामुळे कोकणातील सुमारे १५ लाख मराठ्यांसाठी राजकीय पातळीवर EWS आरक्षण उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. यापुढे होणाऱ्या पोलीस आणि शिक्षक भरतीमध्ये देखील EWS आरक्षण लागू करून कोकणातील तरुणांना शैक्षणिक आणि नोकरीच्या संधी मिळायला हव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी मराठा समाज उद्योजक डिरेक्टरी सर्वांसाठी फायदेशीर ठरेल, असे सांगितले. कोकणातील मराठा समाज शेती-बागायतीत असल्याने व्यवसायाकडे वळला नाही. त्यामुळे तरुणांनी उद्योग-व्यवसायात येऊन नोकरी देणारे बनावे. समाजाची बांधणी करून जास्तीत जास्त फायदा कसा होईल यासाठी प्रयत्न करा, त्याला आमची साथ राहील, असे आवाहन त्यांनी केले. ठाकरे शिवसेना विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी ॲड. सुहास सावंत यांनी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. ते म्हणाले, “आपल्याला आरक्षण मिळेल की नाही यापेक्षा आपण उद्योग व्यवसायात पुढे येऊन नोकरी देणारे बनले पाहिजे.” यासाठी निश्चितच सहकार्य मिळेल, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष विनय गायकवाड यांनी मराठा समाज उद्योजक डिरेक्टरी आणि इतर उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. मराठा महासंघ तालुकाध्यक्ष अभिषेक सावंत यांनी उपस्थितांचे स्वागत करून आभार मानले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles