कॅन्सरसह अनेक दुर्लभ आजारावर मोफत उपचार : संशोधन केंद्राचाही समावेश.
सावंतवाडी : निसर्गाच्या हिरव्यागार कुशीत, चिपळूणजवळ वसलेलं डेरवण गाव आज केवळ एक भूभाग नाही, तर ते वैद्यकीय शिक्षण आणि समाजसेवेचं एक चैतन्यमय केंद्र बनलं आहे. नुकतंच सिंधुदुर्गातील पत्रकारांना श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट (SVJCT) च्या बी.के.एल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचा अभ्यास दौरा करण्याची संधी मिळाली आणि या अनुभवाने त्यांच्या मनावर एक अमिट ठसा उमटवला. हे संकुल म्हणजे केवळ विटा आणि सिमेंटने उभं राहिलेलं रुग्णालय नाही, तर ते ग्रामीण भागाच्या आरोग्याचं आणि शैक्षणिक उन्नतीचं एक जिवंत स्वप्न आहे.
या दौऱ्याची सुरुवातच संस्थेच्या कार्याची सखोल ओळख करून देणाऱ्या सादरीकरणाने झाली.

रुग्णालय संचालिका डॉ. सौ. सुवर्णा पाटील यांनी अत्यंत सहजपणे संस्थेची उद्दिष्ट्ये, आधुनिक सोयीसुविधा आणि गरजू रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शस्त्रक्रियांची माहिती दिली. त्यांच्या शब्दांतून एक गोष्ट स्पष्ट झाली, ती म्हणजे इथे शिक्षण आणि आरोग्यसेवा दोन्ही हातात हात घालून चालतात. डॉ. नेताजी पाटील यांनी रुग्णालयातील अत्याधुनिक मशीनरी आणि उपचार पद्धतींबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितलं की कोट्यवधी रुपयांच्या या उपकरणांमुळे ग्रामीण भागातील लोकांना शहरांमध्ये जाण्याची गरज राहिलेली नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या संस्थेमुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत, ज्यामुळे ग्रामीण भागातून होणाऱ्या स्थलांतराला कुठेतरी आळा बसला आहे. हे ऐकून पत्रकारांना संस्थेची ग्रामीण भागाप्रति असलेली तळमळ जाणवली.

२०१५ साली स्थापन झालेलं हे महाविद्यालय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी (MUHS) संलग्न असून, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) त्याला मान्यता दिली आहे. एमबीबीएस आणि एमडी/एमएस सारख्या अभ्यासक्रमांसाठी NEET परीक्षेद्वारे प्रवेश मिळतो. कॅम्पसमध्ये असलेलं ८१० खाटांचं रुग्णालय, आधुनिक विभाग आणि सुविधांमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळतो. १५० विद्यार्थी संख्येच्या वैद्यकीय महाविद्यालयासोबतच येथे अनेक पॅरामेडिकल अभ्यासक्रम येथे उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून स्थानिक विद्यार्थ्यांना रोजगाराच्या हमखास संधी उपलब्ध झालेल्या आहेत. तसेच हे महाविद्यालय ग्रामीण आरोग्य क्षेत्रातील संशोधनाला प्रोत्साहन देते.
केवळ वैद्यकीय सेवाच नाही, तर शिक्षण आणि खेळालाही इथे समान महत्त्व दिलं जातं. प्रशालेच्या संचालिका सौ. शरयू यशवंतराव यांनी संस्थेच्या प्रशालेतील शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली, तर क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर यांनी अद्ययावत क्रीडा संकुलाची ओळख करून दिली.

’ड्रीम हेल्थ पार्क’ – खेळाच्या माध्यमातून आरोग्याचा ध्यास –
या संकुलातील सर्वात अभिनव आणि हृदयस्पर्शी उपक्रम म्हणजे ‘ड्रीम हेल्थ पार्क’. २० ऑक्टोबर २०१८ रोजी पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर आणि डॉ. टी. रामासामी यांच्या हस्ते उदघाटन झालेल्या या संग्रहालयाने १५ हजारहून अधिक विद्यार्थी आणि खेळाडूंना आरोग्यविषयक ज्ञान दिलं आहे. १६०० चौ. मी. जागेत उभारलेला हा पार्क १० ते १८ वयोगटातील मुलांसाठी खेळाच्या माध्यमातून आरोग्याचे धडे देतो. इथे प्रवेश करताच मुलं आपला बॉडी मास इंडेक्स (BMI) मोजतात. त्यांना जंक फूडचे दुष्परिणाम, योग्य आहाराचं महत्त्व आणि रक्तक्षय कसा ओळखावा याची माहिती मिळते. अनेक मुलं या अनुभवानंतर हानिकारक पदार्थ न खाण्याचा निश्चय करतात. हे पार्क केवळ ज्ञान देत नाही, तर मुलांच्या भविष्यासाठी संस्काराची शिदोरी देतं.


सर्वांगीण विकासाचे केंद्र: क्रीडा आणि सामाजिक उपक्रम –
वालावलकर संकुल केवळ वैद्यकीय शिक्षणापुरतं मर्यादित नाही. १८ एकर जागेवर पसरलेलं अद्ययावत क्रीडा संकुल हे विद्यार्थ्यांच्या आणि स्थानिक तरुणांच्या सर्वांगीण विकासाचं केंद्र आहे. फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉलपासून ते रायफल शूटिंग आणि जलतरणापर्यंत ३५ हून अधिक खेळांसाठी इथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आहेत. तसेच कोट्यावधी रुपये खर्च करून ४०० मीटरची सिंथेटीक ओव्हल धावपट्टी आणि शंभर मीटरची सरळ धावपट्टी त्या ठिकाणी तयार करण्यात आली आहे. फुटबॉलचे विस्तृत असे मैदान, हॉलीबॉल हॉकी बास्केटबॉल यासारख्या मैदानी खेळांसाठी आधुनिक मैदाने तर कबड्डी खो-खो टेबल टेनिस बॅडमिंटन जिम आणि जिम्नॅस्टिकसाठी अत्याधुनिक इनडोअर स्टेडियम तयार करण्यात आली आहेत. इथे क्रीडा संकुलात असलेल्या पाण्याच्या टाकीला संलग्न असा क्लायबिंग ट्रॅक बनविण्यात आला आहे. या सर्व सुविधांच्या माध्यमातून या ठिकाणी दरवर्षी ‘डेरवण युथ गेम्स’ सारखे कार्यक्रम आयोजित करून कोकणातील खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिभा दाखवण्याची संधी दिली जाते.
सामाजिक कार्य व मोफत उपचार –
सामाजिक कार्यातही संस्थेने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत गरिबांना मोफत उपचार, गर्भवती मातांसाठी ‘वालवलकर यशोदा योजना’ आणि ‘वालवलकर माहेर योजना’, कुपोषित मुलांसाठी ‘वालवलकर सुदामा योजना’ आणि मोफत मोतीबिंदू शिबिरं यांसारख्या उपक्रमांनी संस्थेने समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे.
आतापर्यंत डेरवण हॉस्पिटल म्हटले की कॅन्सर हॉस्पिटल असाच लोकांचा समज होता. मात्र या या ठिकाणी जनरल मेडिसिन, बालरोग, रेडिओलॉजी, ऑर्थोपेडिक्स, ॲनेस्थेसिया या सारखे विभाग देखील कार्यरत आहेत. महात्मा फुले योजनेअंतर्गत तसेच आयुष्यमान भारत व इतर शासकीय योजनेच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया येथे मोफत उपलब्ध आहेत. तर योजनांमध्ये समाविष्ट नसलेल्या आजारांबाबत इतर वैद्यकीय सोयी सुविधा देखील या ठिकाणी अतिशय माफक दरात उपलब्ध आहेत. ज्यात ICU, NICU, CT स्कॅन, MRI तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी ट्रॉमा सेंटर यांचा समावेश आहे. रुग्णालयात कर्करोगाच्या उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध आहेत. ज्यामुळे स्थानिक लोकांना उपचारांसाठी मुंबई व अन्य शहरांमध्ये जायची गरज भासणार नाही.
डोळ्यांच्या शस्त्रक्रिया आणि मोफत मोतीबिंदू शिबिरे देखील या ठिकाणी घेतली जातात. गर्भवती महिला आणि मातांसाठी या ठिकाणी विशेष योजना असून ज्याद्वारे त्यांना प्रसूती आणि आरोग्य सेवेसाठी मदत केली जाते. तसेच त्यांना आरोग्याबाबत मार्गदर्शन आणि उपचार देखील दिले जातात.
मातांसोबतच कुपोषित मुलांना पौष्टिक आहार आणि आरोग्य सेवा देण्यासाठी एक केंद्र कार्यरत आहे. येथे मुलांना आणि त्यांच्या मातांना आरोग्य विषयक शिक्षण दिले जाते. ग्रामीण भागात दातांच्या समस्या व उपचार आणि जनजागृती करण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविला जातो.
संशोधन आणि निदान : प्रेरणादायी उपक्रम –
रुग्णालयात डेंग्यू, चिकुन गुनिया, लॅप्टो स्पायरोसिस तसेच स्वाइन फ्लू यासारख्या रोगावर संशोधन आणि निदान करण्यासाठी विषाणू विज्ञान प्रयोगशाळा उपलब्ध आहे. अत्याधुनिक मशिनरींद्वारे या ठिकाणी संशोधन केले जाते. यासाठी विदेशातून देखील अभ्यासक या ठिकाणी भेट देत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
एकूणच, डेरवण येथील बी.के.एल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय हे केवळ एक शिक्षण केंद्र नसून, कोकणातील ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी आणि नवीन पिढीला उज्ज्वल भविष्याची दिशा मिळावी, हे स्वप्न प्रत्यक्षात आणणारं एक कार्यशील केंद्र असल्याचे दिसून आले.


