सावंतवाडी : दोन दिवसापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षणक्षेत्रात एक अतिशय सकारात्मक विचार करायला लावणारी घटना घडली.महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि कोकणचे ज्येष्ठ नेते स्व. भाईसाहेब सावंत यांचे नातू आणि माझे अगदी जवळचे मित्र स्व. विकासभाई सावंत यांचे सुपुत्र श्री. विक्रांत यांनी आपल्या तीर्थरूपांच्या पश्चात सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्विकारली.
साधारणपणे ऐंशी वर्षापूर्वी म्हणजेच देश स्वातंत्र्य होण्यापूर्वी १९४६ मध्ये या शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना झाली.स्थापनेपासून आतापर्यंत अकरा समर्पित महानुभावानी या संस्थेची धुरा अतिशय प्रतिकूल परिस्थितीत अगदी यशस्वीपणे सांभाळली.यामधे माजी आमदार स्व.प्रतापराव भोसले, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.बाळासाहेब सावंत,स्व.भाईसाहेब सावंत, अशानी ही धुरा सांभाळलेली होती.अकरावे संस्थाध्यक्ष हे विकासभाई होते.सातत्याने गेली तब्बल ३४ वर्षाहून जास्त काळ विकासभा ई या संस्थेच्या विकासासाठी आपल्या जीवाच रान करत होते.पत्नीच्या दुर्दैवी व अकाली निधनानंतर विकासभा ईनी आपले दु:ख गिळून आपली सर्व उर्जा संस्थेच्याच सर्वागीण विकासाठी खर्च केली.त्यांच्यासोबत माझी अनेक विषयांवर तासनतास चर्चा व्हायची.या संस्थेच्या स्थापनेच्या वेळचा त्यानी सांगितलेला एक किस्सा मला आठवतो,नवीन शाळा सुरु झाल्यावर गणेश चतुर्थीला नव्यानेच नियुक्त केलेल्या शिक्षकांना त्यांचा मोबदला देण्यासाठी संस्थेकडे पैसे नव्हते अशावेळेस त्यावेळी कार्यरत असलेल्या काही विश्वस्तांनी बाजारात फिरून एक रुपया बत्तीस पैसे एवढी लोकवर्गणी गोळा करून शिक्षकांची सोय केली.


एक त्यागाची आदर्श परंपरा असलेल्या व नावारूपास आलेल्या या संस्थेचे बारावे अध्यक्ष म्हणून ही जबाबदारी विक्रांत याने स्विकारली आहे.खर तर नियतीनेच ही जबाबदारी टाकलेली आहे वयाच्या ३७ व्या वर्षीच.लहानपणीच जन्मदात्या आईचे छायाछञ हरपले.सोन्यासारख्या दोन मुलानां विक्रांतच्या हवाली करून अनपेक्षितपणे विक्रांतच्या सहधर्मचारीणीने जगाचा निरोप घेतला…आणि नियतीचा हा आघात एवढ्यावरच थांबला नाही आमच्या सगळ्यांच्याच दुर्दैवाने विकासभाईनी पण अकाली एक्झिट घेतली.एवढा चारही बाजूनी दु:खाचा डोंगर कोसळलेला असताना विक्रांतवर आलेली जबाबदारी तो त्याच हिमतीने सर्वाना सोबत घेऊन समर्थपणे पार पाडेल असा मला तरी वैयक्तीक ठाम विश्वास वाटतो.त्याला याची पूर्ण जाणीव आहे हे त्याच्याबरोबर अनेकदा चर्चा करताना मला जाणवले.
शाळा हाच विकासभाईंचा श्वास होता.शाळेला मुलभूत सुखसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी कामगारांवर बरोबर अगदी राञौ बारा बारा वाजेपर्यंत वावरताना मी त्याना पाहिलयं. त्यानी निर्माण केलेले हे शैक्षणिक कार्य त्याच विश्वासाने जपण्याची आणि वृध्दींगत करण्याची जबाबदारी आता विक्रांतची आहे.
परवा अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर विक्रांतचा मला फोन आला.मी मुंबईत असल्याने भेटू शकलो नाही..मला म्हणाला,” काका नवीन जबाबदारी स्विकारली आहे.आशिर्वाद व मार्गदर्शन पाहिजे…विक्रांत मार्गदर्शन करण्या एवढा मी मोठा नाही.मात्र शैक्षणिक क्षेत्रातील एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आणि विकासभाईना मनापासूनची श्रद्धांजली म्हणून तू जे जे काही रचनात्मक करशील त्यासाठी सदैव मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे आहे.
प्रिय विक्रांत, तुझे अभिनंदन आणि मनस्वी शुभेच्छा..!
- ॲड. नकुल पार्सॅकर.


