मुंबई : देशात भेसळयुक्त खोकल्याच्या औषधामुळे अनेक बालकांना जीव गमवावा लागला आहे. ‘कोल्ड्रिफ’ नावाच्या कफ सिरपमध्ये तब्बल ४८% ‘डायइथिलीन ग्लायकोल’ हे विषारी रसायन आढळले आहे. हे रसायन ब्रेक ऑइल आणि डिटर्जंटमध्ये वापरले जाते. या भेसळीमुळे सोळांहून अधिक चिमुकल्यांचे मृत्यू झाले असून, यात राजस्थान, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील बालकांचा समावेश आहे. विशेषतः मध्यप्रदेशातील १३ बालकांचा नागपूरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या गंभीर परिस्थितीत, एफडीए अधिकारी मुंबईतील मेडिकल स्टोअर्सकडून कथितरित्या प्रत्येकी ५०० रुपयांची दिवाळी भेट स्वीकारतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे, ज्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेनंतर काही अधिकाऱ्यांचे निलंबन व बदल्या झाल्या असल्या तरी, भेसळ करणाऱ्यांवर हत्येचे गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे. केंद्र सरकारने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय लहान मुलांना कोणतेही औषध न देण्याचे आवाहन केले आहे.


