वृंदावन : प्रेमानंद महाराज हे संपूर्ण भारतात खूप लोकप्रिय आहेत. खासकरून तरुण पिठीला अध्यात्माकडे वळवण्याच प्रेमानंद महाराजांचे मोठे योगदान आहे. ते तरुणांसाठी आदर्श बनले आहेत. देशभरातील भक्त त्यांना भेटण्यासाठी वृंदावनला जात असतात. मात्र प्रेमानंद महाराज गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची पदयात्रा करत नाहीत. त्यामुळे ते खूप आजारी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे त्यांच्या भक्तांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. अशातच आता प्रेमानंद महाराजांच्या आरोग्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रेमानंद महाराजांच्या आरोग्याबद्दल माहिती व्हायरल झाल्यानंतर त्यांचे भक्त अधिकच चिंतेत होते. अनेकांनी राधा राणींकडे त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली होती. तसेच अनेकजण महाराजांचे आरोग्य कसे आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते. अशातच आता प्रेमानंद महाराजांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये प्रेमानंद महाराज भक्तांशी बोलताना दिसत आहेत.
मी पूर्णपणे स्वस्थ – प्रेमानंद महाराज.
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये भक्त त्यांना सांगत आहेत की, ‘काही लोकांनी तुम्ही रुग्णालयात आहात अशा अफवा पसरवल्या आहेत. यावर बोलताना महाराज म्हणाले की, ‘मी पूर्णपणे ठीक आहे आणि तुम्हा सर्वांसमोर बसलो आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून मी एकांतात आहे.’ या व्हिडिओमुळे प्रेमानंद महाराज पूर्णपणे स्वस्थ असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्या भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
कलियुगाचा प्रभाव –
या व्हिडिओमध्ये, त्यांचा एक शिष्य महाराजांना सांगत आहे की, ‘लोकं खऱ्याला खोटे आणि खोट्याला खरे समजत आहेत.’ यावर बोलताना प्रेमानंद महाराज म्हणाले की, हा कलियुगाचा प्रभाव आहे. यामुळे लोक खऱ्याला खोटे आणि खोट्याला खरे समजू लागले आहेत. जर कोणी आजारी आहे असं म्हटलं तर ते सत्य मानतात, मात्र असे लोक एकदाही सत्य काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. अशा लोकांपासून सावध राहणे गरजेचे आहे.’


