- राज्यस्तरीय कथा पुरस्कार नयना गुरव यांना तर कविता पुरस्कारावर आनंद घायवट आणि काशिनाथ वर्देकर यांची मोहोर!
- आंतरजिल्हास्तरीय कथा स्पर्धेत समीर वेंगुर्लेकर तर कविता स्पर्धेत सिद्धी परब यांना प्रथम पुरस्कार.
कणकवली : आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेलतर्फे आयोजित ‘अद्वैत’ दिवाळी अंक २०२५ मधील राज्यस्तरीय व सिंधुदुर्ग – रत्नागिरी आंतरजिल्हास्तरीय कथा-कविता स्पर्धेचे पारितोषिक विजेते जाहीर करण्यात आले आहेत. स्पर्धेचे हे सलग चौथे वर्ष असून या स्पर्धेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद लाभला. राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट कथा पुरस्कार नयना गुरव (शिरोळ, कोल्हापूर) यांच्या ‘सगुणा’ या कथेला मिळाला आहे. तर राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट कविता पुरस्कार आनंद घायवट (कसारा, ठाणे) यांच्या ‘ऋतू चक्राच्या बहरात’ आणि काशिनाथ वर्देकर (हरकुळ बुद्रुक, कणकवली) यांच्या ‘अभिव्यक्ती’ या कवितांना संयुक्तरीत्या देण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग-रत्नागिरी आंतरजिल्हास्तरीय कथा स्पर्धेत समीर वेंगुर्लेकर (कुडाळ) यांच्या ‘सोबती’ या कथेला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. तर श्रेयश शिंदे (कळसुली, कणकवली) यांच्या ‘ग्रीन बूट’ या कथेला द्वितीय पुरस्कार तर नागेश कदम (मालवण) यांच्या ‘आधार’ या कथेला तृतीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. सिंधुदुर्ग-रत्नागिरी आंतरजिल्हास्तरीय कविता स्पर्धेत सिद्धी परब (कळसुली, कणकवली) यांच्या ‘विद्रोही सखा’ या कवितेला प्रथम पुरस्कार, मनीषा पाटील (कणकवली) यांच्या ‘भूतकाळाच्या पटलावरून बाई शोधताना’ या कवितेला द्वितीय तर विजय सुतार (राजापूर) यांच्या ‘बलात्कार’ या कवितेला तृतीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
स्पर्धेचे हे सलग चौथे वर्ष असून या स्पर्धेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद लाभला. कथा स्पर्धेसाठी ख्यातनाम कथा आणि कादंबरीकार आनंदहरी यांनी तर कविता स्पर्धेसाठी विदर्भातील विशाखा काव्यपुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध कवी मोहन शिरसाट यांनी परीक्षण केले आहे. कथा आणि काव्य स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल च्या वर्धापन दिनी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. स्पर्धेतील सर्व विजेत्यांचे आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक राजन चव्हाण आणि ‘अद्वैत’ दिवाळी अंकाच्या कार्यकारी संपादक सरिता पवार यांनी अभिनंदन केले आहे.


