मुंबई: यशाची वाटचाल होत असताना भूतकाळातील क्षण विसरू नयेत, कारण त्या क्षणांत दडलेला आनंद आणि अनुभव हीच खरी प्रेरणा असते. अशाच प्रेरणादायी आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्यासाठी कोकण कला व शिक्षण विकास संस्था गेली १४ वर्षे ‘कोकण कला महोत्सव’ हा भव्य दिव्य कार्यक्रम आपल्या संस्थेच्या वर्धापन दिनी साजरा करते. हा महोत्सव या वर्षी ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबई, दादर येथील स्वातंत्र्य वीर सावरकर नाट्यगृहात होणार असून या कार्यक्रमात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पद्मश्री मुरलीधर पेटकर (चंदू चॅम्पियन), ओमप्रकाश शेटे (अध्यक्ष – आयुष्मान भारत योजना व मुख्यमंत्री सहायता निधी), कमलेश सुतार (संपादक, झी २४ तास), अपूर्वा वैद्य (आनंद फाउंडेशन), वैष्णवी कल्याणकर (अभिनेत्री), बहुआयामी अभिनेते अविनाश नारकर श्रीनिवास नार्वेकर, श्री. प्रशांत बबन यादव (संस्थापक व अध्यक्ष : वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा लि), महेश निंबाळकर आणि कोकण संस्थेचे अध्यक्ष श्री दयानंद कुबल उपस्थित असणार आहे.
या महोत्सवात पारंपरिक नृत्य, रॅम्प वॉक, विविध कला आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित केले जाणार आहे. या उपक्रमांमधून कला, परंपरा व संस्कृतीला जपणे आणि स्थानिक कलाकारांना सादरीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर इतरांसाठी आदर्श ठरलेले. तसेच कोकण चे नाव सातासमुद्रा पार नेणाऱ्या कलाकाराचा सन्मान म्हणजेच – कोकण रत्न पुरस्कार, समाज माध्यमांवर प्रभावीपणे कार्य करणाऱ्या कंटेंट क्रिएटर्ससाठी – रील टू रियल पुरस्कार, शून्यातून स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आणि इतर महिलांसाठी प्रेरणा ठरल्या अश्या ग्रामीण भागातील महिलांसाठी- झिरो टू हिरो पुरस्कार, युवा उद्योजकांसाठी- युथ आयकॉन पुरस्कार, शिक्षण स्वच्छता, महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण संवर्धनात आदर्श असणाऱ्या गावाला- आदर्श गाव पुरस्कार, निःस्वार्थ भावनेने दीर्घकाळ समाजकार्यात कार्यरत असलेले व्यक्तिमत्त्वांना- समाज गौरव पुरस्कार, आपल्या कामातून, विचारातून किंवा सर्जनशीलतेतून समाजाला प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींचा गौरव यू इन्स्पायर पुरस्कार, अशा विशेष पुरस्कारांनी कलाकार आणि विशेष व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्यात येणार आहे.
या महोत्सवाच्या माध्यमातून, कोकण संस्था मराठी कला, संस्कृती आणि समाजसेवेतील योगदान देणाऱ्यांना गौरवण्याचा व नव्या पिढीला प्रेरणा देण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये समाजातील प्रत्येक घटक – कलाकार, शिक्षक, युवा उद्योजक, ग्रामस्थ आणि स्वयंसेवक – यांचा सहभाग असणार आहे. या उत्सवातील विविध उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, संवाद सत्रे आणि सन्मान सोहळा यादिवशी उपस्थित असलेल्या प्रत्येकासाठी अविस्मरणीय ठरणार आहेत. तसेच, ज्यामुळे हा कार्यक्रम फक्त सन्मानाचे ठिकाण नाही तर सामाजिक बदलासाठी एक प्रेरणास्थळ म्हणून देखील नोंदला जाईल.
तरी कोकणावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी ‘कोकण कला महोत्सव २०२५’ या भव्य सोहळ्यात सहभागी होऊन या प्रेरणादायी सोहळ्याचा आनंद घ्यावा असे आवाहन संस्थाध्यक्ष श्री. दयानंद कुबल यांनी केले आहे.


