— आंतरराष्ट्रीय रेटेड ५ खेळाडूंवर मात करत पूर्वांकने वेधले लक्ष!
सावंतवाडी : केवळ आठ वर्षांचा असलेला पुर्वांक कोचरेकर याने आपल्या दुसऱ्याच राष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळ स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत संपूर्ण महाराष्ट्राचे आणि कोकणाचे लक्ष वेधून घेतले आहे. या बाल खेळाडूने स्पर्धेत तब्बल पाच आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडूंवर विजय मिळवत एकूण पाच गुणांची कमाई केली आहे. एवढ्या लहान वयात दाखवलेली ही धडाकेबाज कामगिरी निश्चितच अभिमानास्पद आहे.

लोकमत महा गेम्समध्ये प्रथम क्रमांक राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी करण्यापूर्वी, लोकमत महा गेम्स अंतर्गत आयोजित स्पर्धेत पुर्वांकने प्रथम क्रमांक पटकावून आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला होता. सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर त्याने राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
पूर्वांकच्या या देदिप्यमान यशाबद्दल युवा नेते विशाल परब यांनी त्याचे मनापासून अभिनंदन केले आहे.
विशाल परब यांनी पूर्वांकला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना गौरवोद्गार काढले, “इतक्या कमी वयात राष्ट्रीय पातळीवर यश मिळवणे ही अत्यंत गौरवाची बाब असून, पुर्वांकचा प्रवास अनेक नवोदित खेळाडूंना प्रेरणा देणारा आहे. भविष्यात तो देशाचे नाव उज्ज्वल करेल, अशी मला पूर्ण खात्री आहे.”
पुर्वांक कोचरेकर याच्या या यशाबद्दल रत्नागिरीसह सर्व स्तरातून कौतुक होत असून, त्याच्या पुढील यशासाठी सर्वांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


