सावंतवाडी: आज सकाळीच अतिशय दुर्देवी,वेदनादायक बातमी कानावर पडली आणि मन सुन्न झाले.महाराष्ट्राच्या राजकारणाचे नेहमीच केंद्रबिंदू असलेले आणि प्रशासनावर पकड असणारे नेते अजित पवार यांचे विमान अपघात निधन झाले.संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला.कुणाचाही या बातमीवर विश्वासच बसत नव्हता,पण दुर्दैवाने ही बातमी खरी होती.
आपल्या काकांच्या संस्कारात वाढलेल्या अजित पवारांच्या आयुष्यात आणि राजकीय प्रवासात अनेक वादळं आली.त्या त्या परिस्थितीत त्यानी घेतलेल्या काही राजकीय निर्णयामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली पण दादा डगमगून गेले नाहीत. आयुष्यातील प्रत्येक वादळ त्यानी अतिशय संयमाने शांत केली.
राजकारणात आरोप प्रत्यारोप होतात. निंदा नालस्ती होते.अनेकदा राजकारणात टिकून रहायचे असेल तर हे सगळं सहन करून पुढे जाणारे नेते म्हणजे अजितदादा.
स्व.यशवंतराव चव्हाण हे त्यांचे आदर्श होते.सत्तेसाठी त्यानी जातीयवादी भाजपा बरोबर जाण्याचा निर्णय अनेकानां आवडला नाही.नागपूरच्या अधिवेशनात एका पञकारानी जेव्हा दादाना एक खोचक प्रश्न विचारला की ” दादा तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात जाणार का”? तेव्हा दादानी ताडकन उत्तर दिले” मी पुरोगामी महाराष्ट्राचा नेता आहे,माझ्यावर स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांचे संस्कार आहेत.भाजपसोबत सत्तेत असणे आणि आपण आपली विचारधारा जपणे हे दोन वेगवेगळे विषय आहेत.”
१९८२ मध्ये दादा पहिल्यांदा साखर कारखान्याचे संचालक झाले तेव्हापासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली. शिखर बँकेचे संचालक,खासदार, आमदार,मंञी आणि तब्बल सहा वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंञी आणि बहुतेक वेळा अर्थमंञी हा दादांचा थक्क करणारा राजकीय प्रवास.
रोखठोक भाषा,संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांशी दांडगा संपर्क, हजरजबाबीपणा,प्रसंगी कार्यकर्ता चुकत असेल तर योग्य शब्दात कान टोचणे आणि तेवढेच कार्यकर्त्यांवर प्रेम करणे अशी वेगवेगळी रुपे अवघ्या महाराष्ट्राने अनुभवली.राजकीय परिस्थितीचे भान राखून परिणामाची तमा न बाळगता आव्हानात्मक राजकीय निर्णय घेणारे दादा ही त्यांची प्रतिमा अधोरेखित झालेली होती.परिणामाची तमा न बाळगता आव्हानांना सामोरे जाणारे नेते म्हणून त्यानी आपली प्रतिमा तयार केली होती.
राष्ट्रवादीची दोन छकले झाल्यावर जेव्हा पञकार दादाना कौटुंबिक प्रश्न विचारायचे तेव्हा दादा अनेकदा भावूक झालेले आपण पाहिले आहे.आजच्या विवेकशून्य आणि गतिमान राजकारणात टिकून रहाणे ही तेवढी सोपी गोष्ट राहिली नाही.तरीसुद्धा दादानी या महाराष्ट्रात स्वत:चा एक दखलपात्र असा स्पेस निर्माण केला.राजकीय मंडळी ही वक्तशीर असत नाहित याला दादानी छेद दिलेला होता.प्रशासनाचा अभ्यास नसेल तर अनेकदा लाल फितीचा कारभार करणारे अधिकारी हे अनेकदा मंञ्याना चुना लावत असतात पण या महाराष्ट्रातील आतापर्यंत कोणत्याच अधिकाऱ्यांनी कोणत्याही विषयात दादाना मिसगाईड करण्याची हिंमत केली नाही याचे कारण दादा प्रशाशन कोळून प्याले होते.
दादांच्या पश्चात त्यांच्या पक्षाचे काय होईल ते होईल पण महाराष्ट्राने एक अभ्यासू आणि उत्तम प्रशाशक गमावला.दादा गेल्याचे समजताच अवघ्या महाराष्ट्रातील सर्वपक्षीय, सर्व धर्मातील, जातीतील जनतेने हळहळ व्यक्त केली.हजारो कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला.जणू या नेत्यासाठी अश्रूंचा महापूर निघाला.महाराष्ट्र पोरका झाला.दादा,भावपूर्ण आदरांजली.



