सिंधुदुर्गच्या कबड्डी विश्वात मोठी खळबळ! – ‘जिल्हास्तरीय कबड्डी पंच शिबीर’ अनधिकृत? ; खेळाडू, पंच आणि पालकांना सहभागी न होण्याचे आवाहन.

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कबड्डी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या २६ जुलै २०२६ रोजी आयोजित तथाकथित ‘जिल्हास्तरीय कबड्डी पंच शिबिरा’पासून सावध राहण्याचे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशनने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. तसेच सहाय्यक धर्मादाय आयुक्त, सिंधुदुर्ग यांच्या निर्णयानंतर Public Trust Registration (PTR) मधून वगळण्यात आली असून, संस्थेची मान्यता रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे त्या संस्थेमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या कोणत्याही शिबिराला किंवा उपक्रमाला अधिकृत मान्यता नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

यामुळे कबड्डी खेळाडू, पंच, प्रशिक्षक, क्रीडाप्रेमी आणि पालकांनी अशा अनधिकृत शिबिरांमध्ये सहभागी होऊ नये, कोणत्याही प्रकारचे शुल्क भरू नये, तसेच अशा उपक्रमांच्या आमिषाला बळी पडू नये, असे स्पष्ट आवाहन करण्यात आले आहे.

असोसिएशनने पुढे स्पष्ट केले आहे की, कबड्डी खेळाशी संबंधित अधिकृत पंच परीक्षा, प्रशिक्षण शिबिरे आणि अन्य उपक्रमांची माहिती केवळ नोंदणीकृत सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशन, सावंतवाडी यांच्याकडूनच घ्यावी. तसेच अनधिकृत व्यक्ती किंवा संस्थांकडून आयोजित करण्यात येणाऱ्या कोणत्याही क्रीडा उपक्रमांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ही माहिती नोंदणीकृत सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

 विशेष – या प्रसिद्धीपत्रकामुळे जिल्ह्यातील कबड्डी वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, संबंधित शिबिराच्या वैधतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता यावर संबंधित आयोजक काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण क्रीडा क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles