सायबर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कोकणातील प्रस्तावित अणूऊर्जा प्रकल्पांबाबत गंभीर चिंता! ; डॉ. जयेंद्र परुळेकर यांचे महत्त्वपूर्ण विधान.

सावंतवाडी : तामिळनाडूतील कुडानकुलम अणुऊर्जा प्रकल्पाशी संबंधित कथित सायबर हल्ला आणि डेटा लीक प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात अणूऊर्जा प्रकल्पविरोधी कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी निवेदनाद्वारे गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

डॉ. परुळेकर यांनी म्हटले आहे की, कुडानकुलम अणुऊर्जा प्रकल्पाशी संबंधित मोठ्या प्रमाणात डेटा लीक झाल्याच्या वृत्तांमुळे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भविष्यात अशा प्रकारचे सायबर हल्ले वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अणुऊर्जा प्रकल्पांसारख्या संवेदनशील ठिकाणांच्या सायबर सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.

कोकणातील देवगड, पूर्णगड, बारसू तसेच इतर किनारी भागांमध्ये प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पांबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. भविष्यात अशा प्रकल्पांवर सायबर हल्ले किंवा घातपात झाल्यास त्याचे गंभीर परिणाम संपूर्ण कोकणावर होऊ शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

जैतापूर येथे आधीच मोठ्या क्षमतेचा अणुऊर्जा प्रकल्प प्रस्तावित असताना, आणखी अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याचा विचार पुनर्विचार करण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. कोकणातील पर्यावरण, जैवविविधता आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या प्रकल्पांवर व्यापक सार्वजनिक चर्चा व तज्ज्ञांकडून सखोल मूल्यमापन व्हावे, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, कुडानकुलम प्रकरणाबाबत अधिकृत यंत्रणांकडून वेळोवेळी स्पष्टीकरण आणि सुरक्षा उपाययोजनांबाबत माहिती दिली जात असून, या प्रकरणातील सर्व बाबींची संबंधित स्तरावर तपासणी सुरू असल्याचे समजते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles