भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी 95 धावांचं आव्हान देण्यात आलं आहे. बांगलादेशने दुसऱ्या डावात 10 विकेट्स गमावत 146 धावा केल्या. बांगलादेशकडून शादमान इस्लामने सर्वाधिक 50 धावा केल्या. तर पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या मोनीमूल हक दुसऱ्या डावात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. मोनीमूल हकने 8 चेंडूत फक्त 2 धावा केल्या. तर झाकीर हुसैनने 10, हसन महमूदने 4, कर्णधार नजमूल शांतोने 19, लिटन दासने 1, मेहंदी हसनने 9, मुस्तफिझूर रहीमने 37 धावा केल्या. भारतीय संघाच्या गोलंदाजांनी कसोटीच्या दोन्ही डावात अप्रतिम कामगिरी केली. दुसऱ्या डावात भारताकडून रविचंद्रन अश्विनने 3, रवींद्र जडेजा 4, आकाश दीपने 1, जसप्रीत बुमराहने 3 विकेट्स पटकावल्या.

सामना कसा राहिला?
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताने आपला पहिला डाव 9 बाद 285 धावांवर घोषित केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशचा पहिला डाव भारताने 233 धावांत गुंडाळला होता. भारताला पहिल्या डावात 52 धावांची आघाडी मिळाली. कसोटीतील सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाने आक्रमक खेळ केला. भारतीय संघाने सर्वांत वेगवान 50, 100 आणि 200 धावांचा विक्रम नोंदविला.भारताकडून यशस्वी जैस्वाल (72) आणि केएल राहुल (68) यांनी अर्धशतके झळकावली. विराट कोहली 47 धावा करून शकीब अल हसनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 27 हजार धावाही पूर्ण केल्या. बांगलादेशकडून शाकिब अल हसनने 4 आणि मेहदी हसन मिराजने 3 विकेट घेतल्या. हसन महमूदला 1 बळी मिळाला. भारताकडून तीन अर्धशतकांच्या भागीदारी झाल्या. रोहित आणि यशस्वी यांनी पहिल्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी केली. यशस्वी आणि शुभमन यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी झाली. कोहली आणि राहुल यांनी पाचव्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी केली. भारताने कानपूर कसोटी अनिर्णित राहण्याची चिन्हे असताना विजयाकडे वळवली आहे.


