सिंधुदुर्ग : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून पर्यावरणाबाबत वाढत असलेली जनजागृती ही निश्चितच सकारात्मक बाब आहे. मात्र, याच पार्श्वभूमीवर भाजपच्या “एक झाड आईच्या नावाने” या महाअभियानावर पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
जनकल्याण अभियानांतर्गत जिल्हाभर तब्बल ४० हजार झाडे लावण्याचा निर्धार भाजपने जाहीर केला आहे. हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविला जाईल, त्याला प्रसिद्धीही मिळेल; मात्र दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात, विशेषतः सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील जैवविविधतेने नटलेल्या जंगलांमध्ये सुरू असलेल्या बेसुमार वृक्षतोडीकडे सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते दुर्लक्ष का करत आहेत, असा थेट सवाल डॉ. परुळेकर यांनी केला आहे.
नियोजित शक्तीपीठ महामार्गामुळे तेरा गावांमधील हजारो वृक्ष धोक्यात येणार आहेत. त्या संभाव्य पर्यावरणीय हानीबाबत भाजपची भूमिका काय आहे? तसेच मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणावेळी बांदा ते खारेपाटण दरम्यान लाखो झाडांची कत्तल करण्यात आली होती. त्यावेळी पर्याय म्हणून लावण्यात आलेल्या झाडांपैकी किती झाडे आज जिवंत आहेत, याचा हिशेब कोण देणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
“वृक्षारोपण अत्यावश्यक आहे, याबाबत दुमत नाही. मात्र शेकडो वर्षे उभी असलेली मोठी वृक्षसंपदा वाचविणे हे नव्याने रोपे लावण्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. पर्यावरण संवर्धनाचा खरा अर्थ केवळ फोटोसेशन आणि घोषणांमध्ये नसून विद्यमान जंगलांचे संरक्षण करण्यात आहे,” असे मत डॉ. परुळेकर यांनी व्यक्त केले.
पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या वक्तव्यामुळे जिल्ह्यात वृक्षारोपण विरुद्ध वृक्षसंवर्धन या विषयावर नव्याने चर्चा सुरू होण्याची चिन्हे आहेत.


