पाणीपट्टी दरवाढीविरोधात ठाकरे सेनेचा एल्गार!, रोहा-अष्टमी नगरपालिकेसमोर आमरण उपोषण. ; ‘रोहेकरांवर अन्याय का?’ केला संतप्त सवाल. ; ‘कमी करा… कमी करा… पाणीदरवाढ कमी करा’च्या घोषणांनी परिसर दणाणला! ; दरवाढ मागे न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा. 

✍️ शशिकांत मोरे.

रोहा  : महागाईच्या झळांनी आधीच होरपळणाऱ्या सर्वसामान्य रोहेकरांच्या खिशावर रोहा-अष्टमी नगरपालिकेने वाढीव पाणीपट्टीचा आणखी एक आर्थिक घाव घातल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सोमवारी आक्रमक भूमिका घेत नगरपालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केले. वाढीव पाणीपट्टी तात्काळ रद्द करावी, या प्रमुख मागणीसाठी ठाकरे सेनेने रस्त्यावर उतरून थेट संघर्षाचा मार्ग स्वीकारला असून, “कमी करा… कमी करा… पाणीदरवाढ कमी करा” या घोषणांनी संपूर्ण नगरपालिका परिसर अक्षरशः दणाणून गेला.

रोहा-अष्टमी नगरपालिकेने पाणीपट्टीचा वार्षिक दर तब्बल २,८०० रुपये निश्चित केल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महाड, श्रीवर्धन, मुरूड, अलिबाग, खोपोली, कर्जत, उरण आणि पेण या शहरांच्या तुलनेत रोहेकरांवरच एवढा मोठा आर्थिक बोजा का लादला जात आहे, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व ठाकरे सेनेचे रोहा शहरप्रमुख राजेश काफरे करत असून, चंद्रकांत कडू, प्रीतम देशमुख यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी आंदोलनात सहभाग घेतला. “शिवसेना जिंदाबाद”, “शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडत शिवसैनिकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

नगरपालिकेकडून वीजबिल, कर्मचाऱ्यांचे वेतन, देखभाल-दुरुस्ती खर्च आणि पाणीपुरवठा विभागातील तोटा यामुळे दरवाढ अपरिहार्य असल्याचा दावा करण्यात आला. शासनाने सुचविलेल्या ३,६०० रुपयांच्या दराऐवजी २,८०० रुपये दर निश्चित केल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. मात्र, ही वाढ सर्वसामान्य नागरिकांसाठी अन्यायकारक आणि असह्य असल्याचे सांगत शिवसेनेने दरवाढ मागे घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

उपोषणस्थळी शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, तालुकाप्रमुख नितीन वारंगे, उपतालुकाप्रमुख दुर्गेश नाडकर्णी यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. विशेष म्हणजे सकल मराठा समाज, सिटीझन फोरम तसेच विविध राजकीय व सामाजिक संघटनांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

दरम्यान, पाणीपुरवठा सभापती महेंद्र दिवेकर यांच्या पुढाकाराने कै. द. ग. तटकरे सभागृहात प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चा झाली. मुख्याधिकारी अजयकुमार एडके यांनी पाणीपुरवठा योजनेचा जमा-खर्च अहवाल सादर केला. मात्र, बैठकीत कोणताही ठोस तोडगा निघाला नसल्याने “मागणी मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच राहील” अशी ठाम भूमिका शहरप्रमुख राजेश काफरे यांनी घेतली.

“पाण्याचा प्रश्न आता राजकीय रणांगणात! – रोहेकरांच्या खिशावरील भार कमी होणार की संघर्ष आणखी पेटणार?”

रोहा-अष्टमीतील पाणीपट्टी दरवाढ आता केवळ प्रशासकीय विषय न राहता मोठ्या राजकीय संघर्षाचे केंद्रबिंदू ठरली आहे. वाढीव दर मागे घेण्यासाठी ठाकरे सेनेने आमरण उपोषणाचे अस्त्र उपसल्याने प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांतील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून, आता रोहेकरांना दिलासा मिळणार की आंदोलन अधिक भडकणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles