सावंतवाडी : समाजसेवेचा वसा जपत शिक्षणाच्या उन्नतीसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या कै. विठ्ठल रुक्मिणी गावकर सामाजिक संस्था, इन्सुली यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गावातील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. केंद्रशाळा इन्सुली नं. ४ येथे पार पडलेला हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आणि विद्यार्थ्यांच्या आनंदमय उपस्थितीत संपन्न झाला.
ज्ञानरूपी दीप प्रज्वलित ठेवण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या या संस्थेने केवळ वह्यावाटपापुरतेच आपले कार्य मर्यादित न ठेवता ‘अखंड बक्षीस योजना’ हा अभिनव आणि प्रेरणादायी उपक्रम तब्बल ३० वर्षांपासून अखंडपणे सुरू ठेवला आहे. या योजनेअंतर्गत इन्सुली गावातील १० शाळा व हायस्कूलमधील प्रत्येक इयत्तेतील प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या मुलगा व मुलगी या गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिक देऊन सन्मान करण्यात येतो.

या उपक्रमाबाबत बोलताना केंद्रप्रमुख श्री. ठाकूर सर यांनी संस्थेच्या कार्याचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, “संस्थेचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य, प्रेरणादायी आणि समाजासाठी आदर्शवत आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन अनेक दाते समाजकार्यासाठी पुढे येत आहेत, ही आनंदाची बाब आहे.”
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष शिवराम गावकर, सचिव विनोद गावकर, केंद्रप्रमुख लक्ष्मीकांत ठाकूर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीमती कांदे, तसेच सुधीर गावडे, श्री. सचिन गावडे, संदेश पालव, आआनंद चराटकर, हंसराज गवळे यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षण क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अविरतपणे कार्य करणाऱ्या या संस्थेच्या उपक्रमाबद्दल संपूर्ण इन्सुली गावातून कौतुकाचा वर्षाव होत असून, “ज्ञानदान हेच श्रेष्ठ दान” या उक्तीची प्रचीती संस्थेच्या कार्यातून पुन्हा एकदा अनुभवायला मिळत आहे.



