‘यशदा’त अभ्यास, अन् ‘काश्मीरा’त जल्लोष?, प्रशिक्षणाच्या नावाखाली पर्यटनाचा प्रचार?, सावंतवाडीच्या विकासाचा आराखडा कुठे?, सावंतवाडीकरांचा थेट सवाल! ; “जनतेला विकास हवा, सेल्फी नव्हे! – सत्यार्थ विशेष संपादकीय.

✍️ रूपेश पाटील.

सावंतवाडी आणि दोडामार्गच्या पंचायत समिती सदस्यांचे पुण्यातील यशदा संस्थेत प्रशिक्षण सुरू आहे. तर दुसरीकडे सावंतवाडी नगरपरिषदेचे नगरसेवक आणि नगरसेविका जम्मू-काश्मीरमध्ये प्रशिक्षणासाठी दाखल झाले आहेत. दोन्ही ठिकाणी लोकप्रतिनिधी प्रशिक्षण घेत आहेत, ही लोकशाहीच्या दृष्टीने निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. मात्र सध्या जनमानसात चर्चेचा विषय प्रशिक्षण नसून त्या प्रशिक्षणाच्या निमित्ताने सोशल मीडियावर झळकणारे फोटो ठरत आहेत.

पुण्यातील यशदा ही महाराष्ट्र शासनाची सर्वोच्च प्रशासकीय प्रशिक्षण संस्था. लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी प्रशासन घडविण्याचे ध्येय घेऊन कार्यरत असलेली ही संस्था अनेक दशकांपासून राज्यातील अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींना घडवत आली आहे. ग्रामविकासापासून ते आपत्ती व्यवस्थापनापर्यंत आणि सुशासनापासून ते विकास नियोजनापर्यंत अनेक विषयांवर येथे सखोल मार्गदर्शन केले जाते.

याचप्रमाणे जम्मू-काश्मीर येथे सुरू असलेले नगरसेवकांचे प्रशिक्षणही काही साधे नाही. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था ही देशातील स्थानिक स्वराज्य व्यवस्थेची एक प्रतिष्ठित आणि शताब्दीच्या उंबरठ्यावर पोहोचलेली संस्था आहे. नागरी प्रशासन, स्वच्छता, पर्यावरण, शाश्वत विकास आणि शहर व्यवस्थापन यांसारख्या विषयांवर अभ्यासपूर्ण प्रशिक्षण देण्याची तिची ख्याती आहे.

मात्र प्रश्न प्रशिक्षणाचा नाही, प्रश्न आहे त्याच्या सादरीकरणाचा!

सावंतवाडी आणि दोडामार्गचे पंचायत समिती सदस्य रोज प्रशिक्षणाला उपस्थित राहत असल्याचे फोटो सोशल मीडियावर दिसत आहेत. वर्गखोल्या, चर्चासत्रे, अभ्यास सत्रे आणि मार्गदर्शन कार्यक्रम यांचे दर्शन घडत आहे. त्यामुळे प्रशिक्षण सुरू असल्याची खात्री जनतेला पटते.

परंतु जम्मू-काश्मीरमध्ये गेलेल्या नगरसेवकांच्या बाबतीत चित्र काहीसे वेगळे दिसत आहे. प्रशिक्षण स्थळावरील एखादा फोटो अपवाद म्हणून दिसतो.

मात्र डल लेक, गुलमर्ग, पहलगाम, बर्फाच्छादित पर्वतरांगा आणि पर्यटन स्थळांवरील आनंदाचे क्षण अधिक ठळकपणे झळकत आहेत. परिणामी जनतेच्या मनात प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. डोंगर-दऱ्या, निसर्गरम्य स्थळे, पर्यटनाचा आनंद आणि सहलीचे क्षण यांचे फोटो मोठ्या उत्साहाने प्रसारित होत आहेत. पण ज्या प्रशिक्षणासाठी ते गेले आहेत, त्या प्रशिक्षणातून नेमके काय शिकले, कोणते विषय चर्चिले गेले, सावंतवाडीच्या विकासासाठी कोणत्या कल्पना घेऊन येत आहेत, याबाबत मात्र शांतता दिसून येते. यामुळेच जनमानसात प्रश्न निर्माण होत आहेत.

सावंतवाडी शहरातील रस्त्यांची अवस्था, घनकचरा व्यवस्थापनातील आव्हाने, पाणीपुरवठ्याचे प्रश्न, वाहतूक कोंडी, वाढते शहरी प्रश्न आणि नियोजनाचा अभाव या विषयांवर नगरपरिषदेला अजूनही प्रभावी उपाययोजना करता आलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधी प्रशिक्षणासाठी जातात, तेव्हा नागरिकांच्या अपेक्षा वाढतात. त्यांना वाटते की या अभ्यास दौऱ्यातून काहीतरी नवीन शिकून आपले शहर अधिक चांगले बनविण्यासाठी लोकप्रतिनिधी परत येतील.

पण जेव्हा प्रशिक्षणापेक्षा पर्यटनाचे फोटो अधिक चर्चेत येतात, तेव्हा टीका होणे स्वाभाविक ठरते.

अर्थात, प्रशिक्षणासाठी गेलेल्या प्रत्येक व्यक्तीने पर्यटन करू नये असे कोणी म्हणत नाही. जम्मू-काश्मीरला गेल्यावर तेथील सौंदर्य अनुभवणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. परंतु लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारीही तेवढीच महत्त्वाची आहे. जनतेच्या पैशातून होणाऱ्या अशा प्रशिक्षण कार्यक्रमांचा शेवट फक्त पर्यटनाच्या आठवणींमध्ये होऊ नये, तर त्यातून विकासाचा रोडमॅप तयार व्हायला हवा.

लोकप्रतिनिधी प्रशिक्षणासाठी गेले आहेत की काश्मीर पर्यटनासाठी?

खरे तर या प्रश्नाचे उत्तर नगरसेवकांकडे निश्चितच असेल. कदाचित ते परतल्यानंतर पत्रकार परिषद घेतील. प्रशिक्षणातून काय शिकले, कोणत्या नवीन संकल्पना समजल्या, सावंतवाडीच्या विकासासाठी कोणते मॉडेल उपयोगी पडतील, घनकचरा व्यवस्थापनात कोणते बदल करता येतील, शहर सुशोभीकरणासाठी कोणता आराखडा तयार होईल याचा तपशील देतील. अशी अपेक्षा ठेवायलाच हवी.

 

      

आज सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले फोटो नगरसेवकांची प्रतिमा उंचावत नाहीत, उलट प्रश्नचिन्ह निर्माण करतात. प्रशिक्षण स्थळावरील चर्चांचे मुद्दे, अभ्यासपूर्ण नोंदी, सावंतवाडीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या संकल्पना आणि परतल्यानंतरचा कृती आराखडा जनतेसमोर मांडला गेला असता, तर कौतुकाचा वर्षाव झाला असता.

परंतु लोकशाहीत केवळ काम करणे पुरेसे नसते, ते दिसणेही तितकेच महत्त्वाचे असते. आणि सध्या दिसत आहेत ते पर्यटनाचे फोटो!

सावंतवाडी शहर आज अनेक प्रश्नांनी वेढलेले आहे. रस्त्यांवरील खड्डे, स्वच्छतेचे प्रश्न, वाहतूक कोंडी, पावसाळ्यातील अडचणी, घनकचरा व्यवस्थापनाची आव्हाने अशा अनेक विषयांवर नागरिक उत्तरांची वाट पाहत आहेत. अशा वेळी प्रशिक्षणासाठी गेलेल्या नगरसेवकांनी पर्यटनाचे फोटो पोस्ट करण्यापेक्षा प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाची झलक दाखवली असती, तर नागरिकांच्या मनात अभिमान निर्माण झाला असता.

लोकप्रतिनिधींच्या सहलीवर नव्हे तर त्यांच्या अभ्यासावर लोकांचा विश्वास असतो. काश्मीरचे सौंदर्य निश्चितच मोहक आहे, पण सावंतवाडीकरांना त्यापेक्षा अधिक मोहक वाटेल ती त्यांच्या शहराच्या विकासाची रूपरेषा!

आज टीका होत आहे, उद्या कौतुकही होऊ शकते. त्यासाठी फक्त एकच गरज आहे – प्रशिक्षणातून मिळालेले ज्ञान प्रत्यक्ष विकासकामांमध्ये उतरविण्याची.

कारण अखेरीस इतिहास फोटो आठवत नाही, तो परिणाम आठवतो! आणि जनतेला पर्यटनाच्या आठवणी नकोत, तर विकासाची खात्री हवी आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles