गवळी तिठ्यावरील अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहाची ओळख अवघ्या ४ तासांत! ; PSI प्रमोद पाटील यांच्या कार्यतत्परतेला सलाम!

सावंतवाडी : शहरातील गजबजलेल्या गवळी तिठा परिसरात गुरुवारी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मात्र, सावंतवाडी पोलिसांच्या तत्परतेमुळे अवघ्या ४ तासांत या मृत व्यक्तीची ओळख पटवण्यात यश आले आहे. राजू रामा जामदार (रा. हेरा, ता. चंदगड, जि. बेळगाव, कर्नाटक) असे मयत व्यक्तीचे नाव असून, त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, गवळी तिठा परिसरात एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत पडली असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. नागरिकांनी जवळ जाऊन पाहिले असता, ती व्यक्ती मृत असल्याचे समजले. यानंतर स्थानिकांनी तात्काळ सावंतवाडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि तो उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.

सुरुवातीला या मृत व्यक्तीची ओळख पटलेली नव्हती. ती व्यक्ती कोण आहे, कुठून आली होती आणि तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत गूढ कायम होते. पोलिसांनी परिसरातील नागरिकांकडे तसेच दुकानदारांकडे चौकशी सुरू केली.

‘अशी’ पटली ओळख –

पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तपासादरम्यान पोलिसांनी संबंधित व्यक्तीच्या कामाच्या ठिकाणी जाऊन हजेरी बुक तपासले तसेच तेथील कामगारांकडे चौकशी केली. त्यावेळी संबंधित व्यक्तीने आपल्या मालकाच्या मोबाईलवरून फोन केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कॉल हिस्ट्री तपासून मयताच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला.

पोलिसांनी मयताचा मुलगा सूरज जामदार आणि पत्नी आशा जामदार (दोघे रा. बेळगाव) यांच्याशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर या मृत व्यक्तीची ओळख निश्चित करण्यात आली.

घटना घडल्यानंतर अवघ्या ४ तासांत अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून नातेवाईकांचा शोध घेणारे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील यांच्या तत्परतेचे आणि कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles