– शिक्षक, कर्मचारी, माजी विद्यार्थी आणि मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती.
सावंतवाडी: “माणसं जातात… पण त्यांचे विचार, संस्कार आणि समाजासाठी उभे केलेले कार्य कायम जिवंत राहते,” याची प्रचिती लोकनेते ना. भाईसाहेब सावंत यांच्या ३८व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात आली.
शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात भाईसाहेब सावंत यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थितांच्या डोळ्यांत कृतज्ञतेची भावना तर मनात त्यांच्या कार्याबद्दलचा अभिमान स्पष्टपणे दिसून आला.


शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांतभाई सावंत, पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर, उपाध्यक्ष डॉ. दिनेश गावकर, संचालक सतीशचंद्र बागवे, संदीप राणे, वसुधा मेहेंदळे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी आणि अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून भाईसाहेबांना अभिवादन केले.
यावेळी उपस्थितांनी भाईसाहेब सावंत यांनी शिक्षण, समाजकारण आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांच्या दूरदृष्टीमुळे उभ्या राहिलेल्या शैक्षणिक संस्थांनी आज हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले असून, त्यांचा विचार आणि कार्य पुढील पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी राहील, अशी भावना व्यक्त करण्यात आली.
आरपीडी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, दोडामार्ग हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज तसेच चौकुळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही श्रद्धांजली अर्पण करून “कार्य थांबते, पण कर्तृत्व कधीच संपत नाही,” या शब्दांत लोकनेते ना. भाईसाहेब सावंत यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन केले.



