पुणे : नीट पेपर फुटीनंतर महाराष्ट्रातही आता टीईटी परीक्षा उद्या असताना आज त्याचा पेपर फुटल्याचे जाहीर झाल्याने ही उद्याची परीक्षा रद्द झाली आहे. त्यामुळे दोन लाखाहून अधिक भावी शिक्षकांच्या मेहनतीवर पाणी फेरले आहे. या संदर्भात सर्वस्तरातून सरकारवर चौफेर टीका होत आहे. टीईटी ही परीक्षा शिक्षकांच्या भरतीसाठी घेतली जाते. त्यामुळे या परीक्षेला बसलेल्या २ लाखाहून अधिक शिक्षकांना मोठा मन:स्ताप भोगाला लागला आहे. समाजातील सर्व स्तरातून सरकारच्या या भोंगळ कारभारावर टीका होत आहे.
उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याने परीक्षेची तयारी केलेल्या लाखो शिक्षकांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरले असल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली आहे.एका वाईट प्रवृत्तीच्या माणसाची शिक्षा आम्ही लाखो शिक्षक भोगत आहोत, हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. या घटनेची तात्काळ चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी माध्यमिक एका परीक्षार्थी शिक्षक यांनी केली आहे.
उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर फुटला आहे. टीईटीचा पेपर फुटल्याने उद्या होणारी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांआधी NEET चे पेपर फुटल्याने संपूर्ण देश हादरला होता. या नीट परिक्षेच्या पेपरफुटीमागे महाराष्ट्रातील प्रमुख आरोपी समोर आले होते. त्यानंतर आता पुन्हा शिक्षक पात्रता परीक्षाचे पेपर फुटल्याने पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला आहे. तसेच टीईटीचा पेपर फुटल्यानंतर देशभरातून आता विविध प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) ही इयत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षक पदांसाठी उमेदवारांची पात्रता निश्चित करण्याकरिता MSCE,पुणेद्वारे आयोजित केली जाणारी एक राज्यस्तरीय परीक्षा आहे.
ठाण्यातील भिवंडीतून टीईटी परीक्षेचा पेपर फुटला. या प्रकरणात महत्त्वाची कारवाई करत भिवंडीतील कोनगाव पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतलंय. कोनगाव येथील डायमंड हॉटेलमध्ये पेपरफुटी प्रकरणातील संशयित थांबले असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कोनगाव पोलिसांचे पथक हॉटेलमध्ये दाखल झाले. मात्र, पोलिस पोहोचण्यापूर्वीच संशयित तेथून पसार झाले होते. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत सहारा विमानतळ परिसरातून तिघा संशयितांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना पुढील चौकशीसाठी भिवंडीत आणले असून, त्यांच्याविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पुन्हा टीईटीची परीक्षा कधी होणार?
टीईटीचा पेपरफुटीनंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पेपर फुटीनंतर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. लवकर परीक्षा कधी होणार आहे, याचं नियोजन लवकर कळवू, असं प्रिया शिंदे यांनी सांगितले. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सदर प्रकरणी तिघांवरती गुन्हा दाखल आहे पुढील तपास पोलीस करत आहेत. चौकशी अंतिम निष्पन्न होईल त्याच्यावर कारवाई केली जाईल. अशा प्रकारची परीक्षा घेण्यासाठी तीन आठवड्यांची प्रक्रिया असते, असं प्रिया शिंदे म्हणाल्या. तसेच महाराष्ट्रातील 6 लाख 128 शिक्षकांना पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही. 6 लाख 126 परिक्षार्थी कडून अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. येत्या 2 ते 3 दिवसांनी टीईटी परीक्षेची नवीन तारीख घोषित केली जाईल, अशी माहिती प्रिया शिंदे यांनी दिली. तसेच 37 शहरातील 1028 परिक्षा केंद्रावर पुन्हा नव्याने परिक्षा घेतली जाणार आहे, असंही प्रिया शिंदे यांनी सांगितले.
टीईटीचा पेपर कसा फुटला, नेमकं काय घडलं?
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत 28 जून2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण 1028 केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2026 घेण्याचे प्रस्तावित होते. NEET 2026 च्या परीक्षेमधील गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना केलेल्या होत्या. तथापि, आज 27 जून, 2026 रोजी पहाटेच्या सुमारास गोपनिय माहितीच्या आधारे भिवंडी येथे काही इसमांकडे या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याचे समजल्याने भिवंडी पोलीस यांनी सदर ठिकाणी धाड घातली. यानंतर तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने पडताळणी केली असता, सदर इसमांकडे शिक्षक पात्रता परीक्षा (TET) जून 2026 परिक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आल्याने भिवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.
लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर टाकलेला दरोडा – रोहिणी खडसे
टीईटीचा पेपर फुटला म्हणजे हा केवळ एका परीक्षेचा घोटाळा नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर टाकलेला दरोडा आहे. रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीची किंमत शून्य करणारी ही व्यवस्था नेमकी कोणाच्या संरक्षणाखाली चालते? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी केला आहे.
प्रत्येक वेळी पेपर फुटतो, चौकशीची घोषणा होते, काही जणांना अटक होते आणि नंतर काही दिवसांनी सर्वकाही शांत होते. पण विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील गेलेले महिने, आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रास याची भरपाई कोण करणार? नीट पेपरफुटीचे उदाहरण ताजे असताना टीईटीने पेपर फुटू नये यासाठी योग्य खबरदारी घ्यायला हवी होती. पण कुणाला काही पडले आहे का ? जे स्वतः च फोडाफोडीत व्यस्त आहेत, ते पेपरफुटी कशी रोखणार ? असाही सवाल रोहिणी खडसे यांनी केला आहे.
मंत्री गिरीश महाजन म्हणाले माहिती घेतो…
यासंदर्भातली माहिती मी अद्याप घेतलेली नाही.घटना घडली की नाही ही तपासाची बाब आहे. मात्र, घटना घडली असेल तरीही अतिशय गंभीर बाब आहे. या अशा घटनासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष ठेवून आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोठी यांनी देखील लक्ष घातले होती. निश्चित यासंदर्भात काय घटना घडली आहे त्याची माहिती घेऊनच बोलणं उचित ठरेल अशी प्रतिक्रीया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात हे काय सुरु आहे ? – विजय वडेट्टीवार
महाराष्ट्रात हे काय सुरू आहे? TET पेपर ठाण्यात फुटला आहे.देशपातळीवरील नीट पेपरफुटीचे धागेदोरेही महाराष्ट्रातच सापडले होते. पेपरफुटतात कसे? हे सरकारचे अपयश आहे. सरकारला या परीक्षा व्यवस्थित घेता येत नाहीत. या सरकारला विद्यार्थ्यांशी देणंघेणं नाही अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ही मुले मेहनत करतात हे पेपर लीक होतात त्यांचे भविष्य अंधारात जाते. राज्यकर्त्यांना खुर्चीवर बसण्याचा काही अधिकार नाही. वारंवार पेपर फुटतात यावर कायमचा बंदोबस्त कधी करणार? असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत याची खबरदारी घेतली पाहिजे असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
निर्लज्ज सरकार,बेपर्वा प्रशासन – गजानन काळे (प्रवक्ते – मनसे)
उद्या होणारा TET परीक्षेचा पेपर देखील फुटला. सेवेत असणारे शिक्षक आणि नवीन उमेदवार असे ६ लाखांच्यावर उमेदवार या परीक्षेसाठी राज्यातून बसणार होते. या सरकारला धड परीक्षा घेता येत नाहीत. सरकारचा सतत मुलांच्या भविष्याशी खेळ सुरू आहे. तुमच्या या गोंधळामुळे अजून किती विद्यार्थ्यांचा बळी घेणार आहात असा सवाल मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी केला आहे.सरकार आणि प्रशासन अशी काही गोष्ट शिल्लक आहे का या राज्यात? आमदार,खासदार फोडण्यात व्यस्त असलेल्या सरकार कडून अजून काय अपेक्षा करणार ? निर्लज्ज सरकार,बेपर्वा प्रशासन असल्याचेही मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी म्हटले आहे.



