वेंगुर्ला : विद्यार्थ्यांना सुरक्षित, दर्जेदार आणि सुविधायुक्त शैक्षणिक वातावरण मिळावे, या उद्देशाने महाराष्ट्र भाजप युवा नेते विशाल परब यांनी पेंडूर येथील श्री कुलदेव विद्यामंदिर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दुरुस्तीसाठी मोलाची आर्थिक मदत केली. या मदतीमुळे शाळेतील आवश्यक दुरुस्तीची कामे गतीने पूर्ण होणार असून विद्यार्थ्यांना अधिक सुरक्षित वातावरणात शिक्षण घेणे शक्य होणार आहे.

शाळेच्या दुरुस्तीची गरज लक्षात घेऊन विशालजी परब यांनी तत्परतेने मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे ग्रामस्थ, पालक आणि शाळा व्यवस्थापनाकडून स्वागत करण्यात आले. शिक्षण क्षेत्राला बळकटी देतानाच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य देण्याचा हा प्रयत्न असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी सावंतवाडी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, केतन आजगावकर, सरपंच संतोष गावडे, उपसरपंच मिलिंद गावडे, तंटामुक्ती अध्यक्ष उमेश सावंत, विकास परब, तालुका चिटणीस धिरेंद्र म्हापसेकर, बूथ अध्यक्ष गोविंद साटेलकर तसेच शक्ती केंद्र प्रमुख बंटी जामदार आदी उपस्थित होते.



