बंगळुरु : प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री कृषी थपंडा हिच्या बंगळुरुमधील राजराजेश्वरी नगर येथील फ्लॅटमध्ये बिझनेसमॅन वैशाख मृतावस्थेत आढळले होते. मागच्या आठवड्यातील या घटनेने एकच खळबळ उडाली होती. आता अभिनेत्री कृषी थपंडा पहिल्यांदाच जाहीरपणे या विषयावर बोलली आहे. तिने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट केली आहे. ‘या वेदनादायी प्रसंगावर असं जाहीरपणे बोलावं लागेल असं कधी वाटलं नव्हतं’ असं कृषीने लिहिलय. “मला असं काहीतरी लिहावं लागेल याची मी कधी कल्पना केली नव्हती. असं काही लिहून जगासमोर ते मांडावं एवढी माझ्यात ऊर्जा नाही आणि मानसिक शक्ती सुद्धा नाहीय. मी आधी ठरवलेलं की या सर्व प्रकरणावर शांत रहायचं. पण सतत जी चर्चा सुरु आहे, सातत्याने माझ्याबद्दल, माझ्या मित्र परिवाराबद्दल, दोन्ही कुटुंबांबद्दल जे प्रश्न विचारले जातायत. त्यामुळे आता माझ्याकडे बोलण्याशिवाय पर्याय उरलेला नाही” असं कृषी थपंडाने लिहिलय.
“जे काही घडलं, त्यात मी अशा माणसाला गमावलं, जो माझ्या ह्दयाच्या सर्वात जवळ होता, जो नेहमी माझ्यासाठी उभा राहिला, माझा बचाव केला, काही अपेक्षा न ठेवता प्रेमळ मनाने माझी काळजी घेतली. त्याच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती शब्दात मांडता येणार नाही” अशा शब्दात कृषी थपंडाने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये आपल्या भावना मांडल्या आहेत. दीर्घ काळापासून मनाव जे भावनिक ओझ वाहत होती, त्या बद्दलही ती बोलली.



