चिंतन –
फारपूर्वी, म्हणजे ५०-६० वर्षांपूर्वी, ग्रामीण भागात एखादी चोरी झाली की, गावातील लोक त्या दृष्टीने सतर्क होत असत. साधारणपणे पुन्हा किमान दोन-तीन वर्षे त्या गावातच नव्हे, तर आसपासच्या गावांतदेखील चोरी होत नसे. पूर्वी चोरमंडळी लोकांना ती चोरी विसरायला वेळ देत असावीत.
अलिकडे केवळ चोरच नव्हे, तर सर्वच प्रकारचे गुन्हेगार असा वेळ द्यायला तयार नाहीत. सोलापूर येथे दोन-तीन वर्षांपूर्वी एका शिक्षणाधिकाऱ्याला लाच स्वीकारताना अटक झाली. ती बातमी दुसऱ्या दिवशी सर्व वर्तमानपत्रांत अगदी ठळकपणे प्रसिद्ध झाली. आणि त्याच दिवशी त्याच आवारातील एका महिला अधिकाऱ्याला लाच घेताना पकडण्यात आले. त्या मॅडमच्या धाडसाला सलाम!
बीडमध्ये गेल्या वर्षी संतोष देशमुख हत्याकांड गाजले. त्या बातम्या दूरचित्रवाणीवर चर्चिल्या जात असतानाच बीडमध्येच तशाच प्रकारचे आणखी दोन गुन्हे झाल्याचे प्रसिद्ध झाले. पहिल्या गुन्ह्यातील गुन्हेगारांना पकडलेले असतानाही इतरांना असे कृत्य करण्याचे धाडस येते तरी कोठून?
गेल्या आठवड्यात पुण्यातील अग्रवाल खूनप्रकरण गाजत असताना सांगली येथे एका स्त्रीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केला. तर शेजारच्या कर्नाटक राज्यात एका सॉफ्टवेअर इजिनिअर मुलीने आपल्या प्रियकराच्या मदतीने अत्यंत थंड डोक्याने, आई ‘ वडील व भाऊ या तिघांचा खून केला . NEET परीक्षेचा बोजवारा उडालेला असताना व त्या घोटाळ्यातील काही सदस्यांना अटक झालेली असताना आता TET चापेपर लीक करण्याचे धाडस कसे केले जाते?, या मंडळींना पोलिसांचा किंवा समाजाचा धाक वाटतच नाही का? आपण करीत असलेल्या कृत्याच्या परिणामांची जाणीव त्यांना होत नसावी का?
एकूणच, स्वतःच्या वैयक्तिक सुखापलीकडे न पाहण्याची वृत्ती, आपण करीत असलेल्या कृत्याच्या परिणामांबद्दलचे गांभीर्य नसणे, किंवा आपण करीत असलेल्या कृतीमध्ये काही गैर नाही असा गैरसमज, पोलिस यंत्रणेकडून आपण पकडले जाणार नाही याबद्दलचा भरवसा, अथवा पैसा किंवा सत्तेच्या जोरावर आपण सुखरूप राहू असा विश्वास—या कारणांमुळे ही मंडळी गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी कोणतीही उसंत घेत नसावीत.
अलिकडे सर्वच जबाबदाऱ्या शासनाने स्वीकारल्या आहेत (आणि त्या पूर्णपणे पार पाडण्यात शासनाला अपयश येत आहे ) त्यामुळे सामाजिक धाक नावाची गोष्टच उरलेली दिसत नाही. म्हणजेच ना सामाजिक धाक, ना पोलिसांचा धाक, ना न्यायव्यवस्थेचा धाक! परिणामी अशा धाडसी लोकांचे धाडस वाढत आहे आणि समाजात अशी बेधडक वृत्ती अधिकाधिक वाढत चालली आहे. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूप धारण करीत आहे.
– डॉ. ह. ना. जगताप
दि. ०३ जुलै २०२६
मो. ९८२२ ६१५ ४६४



