सावंतवाडी : गेल्या तब्बल तीन दिवसांपासून संपूर्ण न्हावेली गाव अंधाराच्या विळख्यात अडकले असून ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. एकीकडे पावसाळ्यातील संकटांचा सामना करत असताना दुसरीकडे वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. अशातच वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी जाब विचारण्यासाठी गेलेल्या न्हावेलीचे माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य अक्षय पार्सेकर यांना सावंतवाडी महावितरणच्या उपअभियंत्याकडून कथितरित्या उद्धट व अरेरावीची वागणूक मिळाल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे.
पार्सेकर यांच्या म्हणण्यानुसार, न्हावेली गावासाठी स्वतंत्र वायरमनची मागणी गेली दोन वर्षे सातत्याने करण्यात येत आहे. मात्र, त्याकडे महावितरण प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत विचारणा केली असता संबंधित अधिकाऱ्यांनी “न्हावेलीला वायरमन देत नाही आणि देणारही नाही… संध्याकाळी तुम्हाला दाखवतो,” अशा अवमानकारक शब्दांत उत्तर दिल्याचा दावा पार्सेकर यांनी केला आहे.
या कथित प्रकारामुळे लोकप्रतिनिधींच्या सन्मानाचा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगत पार्सेकर यांनी महावितरणच्या कारभारावरही जोरदार हल्लाबोल केला. स्थानिक तरुणांना कंत्राटी तत्त्वावर कामावर घेऊन त्यांच्याकडून सलग १८-१८ तास जीव धोक्यात घालून काम करून घेतले जाते, तर वरिष्ठ अधिकारी कार्यालयात बसून केवळ आदेश देत असल्याची टीका त्यांनी केली. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या श्रमाचे योग्य मूल्यमापन होत नसल्याने त्यांच्यावर अन्याय होत असल्याचाही आरोप त्यांनी केला.
“जनतेला अंधारात ठेवणाऱ्या आणि लोकप्रतिनिधींशी अरेरावीची भाषा वापरणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. न्हावेलीच्या हक्कासाठी आणि अन्यायग्रस्त कंत्राटी कामगारांच्या न्यायासाठी हा लढा आता अधिक तीव्र केला जाईल,” असा इशारा अक्षय पार्सेकर यांनी दिला.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची तक्रार स्थानिक आमदार, जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे ऊर्जा मंत्री यांच्याकडे करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. तीन दिवसांपासून अंधारात खितपत पडलेल्या न्हावेली गावाचा वीजपुरवठा तातडीने सुरळीत करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
दरम्यान, महावितरणच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या प्रकरणाकडे आता प्रशासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.



