भाजपा युवा नेते विशाल परब यांचा आक्रमक पाठपुरावा! ; सावंतवाडी मतदारसंघातील प्रत्येक प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने लढणार!
सावंतवाडी : अतिवृष्टीमुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेल्या वीजपुरवठा, रस्ते, मोबाईल नेटवर्क, पाणीपुरवठा आणि अन्य मूलभूत सुविधांच्या गंभीर प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी भाजपा युवा नेते विशाल परब यांनी थेट मुंबईत धाव घेत राज्य नेतृत्वासमोर जनतेच्या व्यथा मांडल्या. त्यांच्या या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत लवकरच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन आवश्यक निर्णय घेतले जाणार असल्याची ग्वाही देण्यात आली आहे.
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊन संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावण्यात येणार असून, वीजसह विविध प्रश्नांवर युद्धपातळीवर उपाययोजना राबविण्यात येतील, असे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.
याच पार्श्वभूमीवर भाजपा महाराष्ट्र युवा नेते विशाल परब यांनी मुंबई येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचे सविस्तर निवेदन सादर केले. अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये विस्कळीत झालेला वीजपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, कोसळलेले पूल, मोबाईल नेटवर्कचा खोळंबा, पाणीपुरवठ्याच्या समस्या आणि अन्य मूलभूत सुविधांची बिकट परिस्थिती त्यांनी प्रभावीपणे मांडत तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली.
विशाल परब यांच्या निवेदनाची गंभीर दखल घेत प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात येतील तसेच सर्व प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेऊन नागरिकांना तातडीने दिलासा देण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.
यावेळी बोलताना भाजपा युवा नेते विशाल परब म्हणाले, “संकटाच्या प्रत्येक क्षणी भारतीय जनता पक्ष जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील एकही प्रश्न प्रलंबित राहू देणार नाही. वीजपुरवठा असो, रस्ते, पाणी किंवा अन्य कोणतीही मूलभूत सुविधा असो, प्रत्येक प्रश्नासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करून जनतेला न्याय मिळवून देऊ.”
अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या नागरिकांना तातडीचा दिलासा मिळावा आणि विकासकामांना नव्याने गती मिळावी, यासाठी विशाल परब यांनी सुरू केलेल्या पाठपुराव्यामुळे प्रशासनही आता अधिक सक्रिय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



