सावंतवाडी : माहितीचा अधिकार कायद्याच्या प्रभावी वापरातून जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने संघर्ष करणारे, पारदर्शक प्रशासनाची बाजू ठामपणे मांडणारे आणि सामाजिक बांधिलकी जपत विधायक कार्य करणारे माहिती अधिकार पदाधिकारी सुशिल रूपाजी चौगुले यांच्या कार्याचा गोवा राज्यातर्फे विशेष गौरव करण्यात आला. सामाजिक, सांस्कृतिक आणि सेवाभावी उपक्रमांसाठी प्रसिद्ध असलेल्या सम्राट इंटरनॅशनल क्लब, शाखा मायेम (गोवा) यांच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून शासन व्यवस्था अधिक उत्तरदायी आणि पारदर्शक करण्यासाठी चौगुले यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांच्या निःस्वार्थ सेवाभाव, प्रामाणिक कार्यपद्धती आणि जनहितासाठीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे त्यांची महाराष्ट्रातील माहिती अधिकार क्षेत्रातील एक विश्वासार्ह आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख निर्माण झाली आहे.
या सन्मान सोहळ्यावेळी सावंतवाडी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, सम्राट इंटरनॅशनल क्लब, मायेम (गोवा)चे पदाधिकारी, सदस्य तसेच सामाजिक, सांस्कृतिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुशिल चौगुले यांना मिळालेला हा सन्मान केवळ त्यांच्या वैयक्तिक कार्याचा गौरव नसून, माहिती अधिकाराच्या माध्यमातून जनहितासाठी झटणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या कार्याची मिळालेली पावती असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. त्यांच्या या उल्लेखनीय सन्मानाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



