कुडाळ : समाजसेवा ही केवळ आर्थिक मदत करण्यापुरती मर्यादित नसून समाजाच्या प्रत्येक घटकाच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची भावना जपणे, हीच खरी सेवाभावाची ओळख आहे. याच उदात्त विचारातून सावंतवाडी येथील ‘इनरव्हील’ या सेवाभावी महिला संस्थेने कुडाळ तालुक्यातील माणगाव येथे एक प्रेरणादायी उपक्रम राबवित शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या कष्टमय जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. शेतकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेत सेंद्रिय व गांडूळ खतांचे वाटप करून बळीराजाप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यात आली.
संस्थेच्या अध्यक्षा सौ. वैभवी शेवडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या उपक्रमात सौ. नीना कशाळीकर, सौ. अन्नपूर्णा कोरगावकर, सौ. अनिता भाट, सौ. शकुन म्हापसेकर, सौ. रिया रेडीज, सौ. ममता पाटणकर, सौ. उल्का डिसूझा, सौ. मीनल नाईक, सौ. साधना रेगे, सौ. प्रज्ञाली ढेरे, सौ. भारती देशमुख, सौ. देवता हावल, सौ. डॉ. नेत्रा सावंत आणि सौ. दर्शना देसाई यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
समाजाचे आपण देणे लागतो, या भावनेतून कार्य करणाऱ्या या संस्थेने यापूर्वीही गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप, विद्यार्थिनींना सायकलींचे वितरण, आरोग्य शिबिरे, जनजागृतीपर परिसंवाद तसेच विविध सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. आता शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत त्यांनी शेती क्षेत्रालाही आपल्या सेवाकार्यात सामावून घेतले आहे.
यावेळी महिलांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले, “भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे शेती आणि देशाचा खरा अन्नदाता म्हणजे बळीराजा. आपण बाजारातून सहज खरेदी करत असलेल्या धान्यापासून भाजीपाल्यापर्यंत प्रत्येक गोष्टीमागे शेतकऱ्याचे अथक श्रम दडलेले आहेत. त्या श्रमांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आम्ही शेतात आलो आहोत. शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या शेतीला हातभार म्हणून सेंद्रिय व गांडूळ खतांचे वाटप करत आहोत.”
कोकणातील निसर्गसंपदेने भारावून गेलेल्या महिलांनी पर्यावरण संवर्धनाचाही ठाम संकल्प व्यक्त केला. “फेसाळणारे समुद्रकिनारे, हिरवाईने नटलेले सह्याद्रीचे डोंगर आणि समृद्ध जैवविविधता ही कोकणची खरी ओळख आहे. हे नैसर्गिक वैभव टिकवायचे असेल तर पर्यावरणाचे संरक्षण प्रत्येकाने केले पाहिजे. अन्यथा पुढील पिढ्या आपल्याला कधीच माफ करणार नाहीत. भविष्यात वृक्षसंवर्धनासाठीही ‘इनरव्हील’च्या माध्यमातून व्यापक उपक्रम राबविणार आहोत,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
शहरी भागातील सुशिक्षित महिला आपल्या बांधावर येऊन कष्टाचे मोल जाणून घेत असल्याचे पाहून शेतकरीही भावूक झाले. आपल्या श्रमांना समाजातून मिळालेला हा सन्मान त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलवून गेला.
यावेळी सोसायटीचे चेअरमन श्री. अवि राणे, सामाजिक कार्यकर्ते श्री. महेश भिसे तसेच श्री. गुरु पालकर उपस्थित होते.
“शेतकऱ्यांच्या बांधावर उतरलेला सेवाभाव, निसर्गसंवर्धनाचा संकल्प आणि समाजऋण फेडण्याची तळमळ” या त्रिसूत्रीमुळे ‘इनरव्हील’ संस्थेचा हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.



