सावंतवाडी : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन शिक्षणाला बळ देण्याच्या उद्देशाने भाजप युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून इन्सुली जिल्हा परिषद मतदारसंघातील अंगणवाडी ते जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना वह्या व दप्तरांचे वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. इन्सुली परिसरातील विविध शाळांमध्ये साहित्याचे वितरण पूर्ण झाल्यानंतर आज निगुडे जिल्हा परिषद शाळा क्रमांक १, शाळा क्रमांक २ तसेच अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना वह्या व दप्तरे वितरित करण्यात आली.
या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक नारायण नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी मार्गदर्शन करताना नितीन राऊळ म्हणाले, “विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत आवश्यक शैक्षणिक साहित्य वेळेवर उपलब्ध करून देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. वह्या व दप्तरांचे वेळेवर वितरण झाल्याने विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास अधिक सुलभ होतो. प्रत्येक विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात राहावा, यासाठी जिल्हा परिषद सातत्याने प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांनी या साहित्याचा योग्य उपयोग करून मनापासून शिक्षण घ्यावे, तसेच पालकांनीही मुलांना नियमित शाळेत पाठवून त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन द्यावे.” असे आवाहन त्यांनी केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या.
यावेळी पंचायत समिती सदस्य सदाशिव राणे तसेच सरपंच सेवा संघ सावंतवाडी तालुकाध्यक्ष व कास गावचे सरपंच प्रवीण पंडित यांनीही विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश गावडे, निगुडेचे माजी सरपंच समीर गावडे, माजी उपसरपंच गुरुदास गवंडे, शिक्षक प्रशांत कांदे, हेमंत सावंत, बाबुराव धुरी, शिक्षिका प्रांजल देसाई, कुसाजी मेस्त्री, अंगणवाडी सेविका रंजना सावंत, मदतनीस शिरसाठ, शिक्षण समिती सदस्य संतोष राणे, किशोर जाधव तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत कांदे यांनी केले. शेवटी मुख्याध्यापक नारायण नाईक यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक, पालक व सहकाऱ्यांचे आभार मानले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साहामुळे हा उपक्रम संस्मरणीय ठरला.



