सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील माजगाव परिसरात ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत बेकायदेशीरपणे नेट केबल व्यवसाय सुरू असून संबंधितांकडून अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीचा मनोरंजन कर न भरता शासनाचा महसूल बुडविल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी माहिती अधिकार महासंघाचे सावंतवाडी तालुका प्रमुख सुशील रूपाजी चौगुले यांनी ग्रामपंचायत अधिकारी, माजगाव यांच्याकडे लेखी तक्रार सादर करून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, माजगाव येथे काही नेट केबल व्यावसायिकांकडून सुमारे ५ ते ६ हजार ग्राहकांना सेवा पुरवली जात असून प्रति कनेक्शन दरमहा ५०० ते ६०० रुपये शुल्क आकारले जाते. मात्र, या व्यवसायावर ग्रामपंचायतीचा कोणताही कर भरला जात नसल्याचा आरोप अर्जात करण्यात आला आहे.

अर्जात २०१५ पासून आजपर्यंतचा थकीत कर तात्काळ वसूल करावा, तसेच शासन निर्णयानुसार सात दिवसांच्या आत कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. संबंधितांकडून करचुकवेगिरी झाल्याचे आढळल्यास फसवणूक व शासन महसूल बुडविल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हे दाखल करावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा पुढील प्रशासकीय व कायदेशीर लढा उभारण्यात येईल, असा इशारा तक्रारदार सुशील चोगुले यांनी दिला आहे.
सदर अर्जाची प्रत माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत पुढील कार्यवाहीवर लक्ष ठेवण्यासाठी संबंधित विभागांनाही पाठविण्यात आल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे.



