सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रीडा इतिहासात नवा सुवर्णअध्याय लिहिला गेला. जिल्ह्यातील खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत जिल्हा क्रीडा संकुलात उभारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सिंथेटिक टेराफ्लेक्स बॅडमिंटन कोर्टाचे आणि अत्याधुनिक क्रीडा साहित्याचे लोकार्पण खासदार नारायण राणे यांच्या हस्ते, तर पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गनगरी परिसरात सर्व अत्याधुनिक सुविधा असलेले भव्य क्रीडा संकुल उभारण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा करून जिल्ह्यातील क्रीडाविश्वाला मोठी भेट दिली.

यावेळी पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, “सिंधुदुर्गच्या मातीत प्रतिभेची कमतरता नाही; गरज आहे ती दर्जेदार सुविधा आणि सक्षम व्यासपीठाची. शासन खेळाडूंच्या पाठीशी ठामपणे उभे असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणारे खेळाडू घडावेत, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. आगामी काळात सिंधुदुर्गनगरी येथे अत्याधुनिक आणि सर्व सुविधांनी युक्त क्रीडा संकुल उभारून जिल्ह्याला महाराष्ट्रातील आदर्श क्रीडा केंद्र म्हणून विकसित करण्यात येईल.”
खासदार नारायण राणे यांनी आपल्या मनोगतात खेळ संस्कृतीची जपणूक ही काळाची गरज असल्याचे सांगत, “खेळाडूंना प्रोत्साहन देणे ही संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. नियमित सराव, पौष्टिक आहार आणि मानसिक-शारीरिक तंदुरुस्ती यांच्या जोरावरच मोठे यश मिळते. शासनाकडून आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. सिंधुदुर्गमधून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडावेत, यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन केले.
जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीच्या पुढाकारातून बॅडमिंटन हॉलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिंथेटिक टेराफ्लेक्स कोर्ट तसेच विविध क्रीडा प्रकारांसाठी अत्याधुनिक क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. या सुविधांमुळे जिल्ह्यातील खेळाडूंना आधुनिक वातावरणात दर्जेदार प्रशिक्षण घेता येणार असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी अधिक सक्षम तयारी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या कार्यक्रमास आमदार दीपक केसरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, विविध विभागांचे अधिकारी, क्रीडा प्रशिक्षक, खेळाडू आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



