पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 किलो वजनी गटात अंतिम सामन्यापूर्वीच भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र ठरवल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. पॅरिस ऑलिम्पिक मध्ये हातातोंडाशी आलेले पदक हिरावले गेल्याने विनेश फोगाट आणि भारतीय चमूला मोठा धक्का बसला आहे. या घटनाक्रमावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. पीएम मोदी यांनी विनेशला धीर देणारे ट्वीट केले आहे. दरम्यान, या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष पीटी उषा यांच्याशी चर्चा केली आहे.
विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र ठरली आहे. विनेश फोगाट 50 किलो फ्रीस्टाइलच्या गटात खेळत होती. मात्र तिचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे विनेश फोगाटला अपात्र ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्पर्धेच्या नियमांनुसार, स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावे लागते.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, “विनेश, तू चॅम्पियन आहेस! तू भारताचा अभिमान आहात आणि प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणा आहे. आज सगळ्यांनाच धक्का बसला आहे. मला माहित आहे की, आव्हान स्वीकारणे हा तुझा स्वभाव आहे. तू मजबूतीने कमबॅक करशील”, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.


