आषाढी महाएकादशीनिमित्त सावंतवाडीतील विठ्ठल मंदिरात ५ दिवस भक्तिरसाची मेजवानी! ; कीर्तन, भजन, संगीत व पालखी सोहळ्याचे आयोजन.

सावंतवाडी : आषाढी महाएकादशीच्या पावन पर्वानिमित्त सावंतवाडी येथील देव विठ्ठल-रखुमाई मंदिरात शनिवार, २५ जुलै ते बुधवार, २९ जुलै २०२६ या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सुश्राव्य भक्तिसंगीत, भजन, कीर्तन आणि पालखी सोहळ्यामुळे मंदिर परिसर संपूर्ण पाच दिवस भक्तिमय वातावरणाने दुमदुमून जाणार आहे.

शनिवार, २५ जुलै रोजी सकाळी ६ वाजता काकड आरती व महापूजा होणार असून, या महापूजेचा मान श्री. शेखर गुरुनाथ धारगळकर व सौ. शर्वरी शेखर धारगळकर यांना लाभला आहे. त्यानंतर सकाळी ११.३० ते दुपारी २ या वेळेत श्री सद्गुरु संगीत विद्यालय यांच्याकडून भक्तिमय गायनाचा सुश्राव्य कार्यक्रम सादर केला जाणार आहे.

दुपारी २ ते ३ या वेळेत श्री कालिका देवी भजनी मंडळ, कारिवडे यांचे भजन, तर ३ ते ४ या वेळेत महिला मंडळ, सावंतवाडी यांचा भजनाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी ४ ते ६ या वेळेत पंडित योगेश बोरचाटे (माणगाव) यांचे सुश्राव्य संगीत गायन रंगणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६ ते ८ या वेळेत कीर्तनभूषण ह.भ.प. विलासबुवा गरवारे (कुरोली सिद्धेश्वर, सातारा) यांचे कीर्तन होणार असून, रात्री ९ नंतर श्रींची पालखी सेवा पार पडेल.

रविवार (२६ जुलै) आणि सोमवार (२७ जुलै) रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत ह.भ.प. विलासबुवा गरवारे यांचे कीर्तन होणार असून, त्यानंतर रात्री ९ नंतर श्रींची पालखी सेवा होईल.

मंगळवार (२८ जुलै) रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत कीर्तनभूषण ह.भ.प. सौ. सिद्धी मेस्त्री (ओटवणे) यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर श्रींची पालखी सेवा होणार आहे.

बुधवार (२९ जुलै) रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत कीर्तनभूषण ह.भ.प. श्री हृदयनाथ गावडे (साळगाव) यांचे काला कीर्तन होणार असून, याच कार्यक्रमाने या भक्तिमय सोहळ्याची सांगता होईल.

आषाढी महाएकादशीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन देव विठ्ठल-रखुमाई मंदिर समिती यांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles